राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनी गाजवलेली 'ती' सभा ठरली शेवटचीच!

राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनी गाजवलेली 'ती' सभा ठरली शेवटचीच!

पिंपरी  : राष्ट्रवादी काँग्रेसचे कणखर नेतृत्व, एक अभ्यासू नगरसेवक, गैरव्यवहाराविरुद्ध लढवय्या नेता, भोसरी विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याचे स्वप्न उराशी बाळगणारा चिखलीतील सुपुत्र आणि वय कमी असूनही 'काका' म्हणून सर्वांचे परिचित व्यक्तिमत्व म्हणजे दत्ता साने. तब्बल तीन वेळा नगरसेवक म्हणून जनसामान्यांत लोकप्रियता मिळवलेले आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवलेले अभ्यासू नेतृत्व आज हरपले. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने २२ जून रोजी ते थेरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल झाले. कोरोना टेस्ट करण्यात आली. २४ जून रोजी रिपोर्ट आला पाॅझिटिव्ह. पण, त्यांचा कोरोना विरुद्धचा लढा अपूर्ण राहिला. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना आज शनिवारी पहाटे ५.४० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. 

'काका' नावानेच लौकिक

दत्ता साने. वय वर्ष अवघे ४७. ते पहिल्यांदा नगरसेवक झाले तेव्हा, वय होते अवघे ३३-३४. तरुण चेहरा. पण, सर्व जण त्यांना काका या टोपण नावानेच संबोधत होते. त्यांच्या प्रत्येक कृतीतून त्यांनी काका संबोधनाला न्याय मिळवून दिला. लहान-मोठ्यांचेच ते काका झाले होते. महापालिका सभागृहात सुद्धा पीठासन अधिका-यांसह सर्वांचे ते काका होते. 

कोरोना काळात मदत

कोरोनामुळे २२ मार्चपासून लाॅकडाउन सुरू झाले. दुकाने बंद झाली. कंपन्या, कारखान्यांचे शेटर डाउन झाले. अनेकांचा रोजगार गेला. आता खायचे काय आणि जगायचे कसे? असा प्रश्न अनेकांपुढे उभा राहिला. पण, त्यावर उपाय दत्ता साने यांनी शोधून काढला. सरकारी किंवा महापालिका यंत्रणेकडून मदत मिळेल, याची वाट न पाहता साने यांनी पदरमोड करीत ट्रकच्या ट्रक भरून जीवनावश्यक वस्तू, धान्य मागवले. त्यांचे स्वतंत्र किट तयार केले आणि येईल त्याला व मागेल त्याला किट दिले. ती व्यक्ती कोण, कुठली याचा कोणताही विचार केला नाही. फक्त दातृत्वाची भावना व समाजाप्रती उतराई हीच त्यांची भावना होती.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अन्य आजारही

श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने दत्ता साने खाजगी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांचा स्वॅब २२ जून रोजी घेण्यात आला होता. २४ रोजी रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना न्यूमोनिया, उच्च रक्तदाब, आधीचा आजार व मधुमेह असल्याने त्यावर उपचार सुरू होते, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

एक जूनची सभा गाजवली

लाॅकडाउनमुळे महापालिका सर्वसाधारण सभा एप्रिल व मे महिन्यात झाली नव्हती. एक जून रोजी विशेष सभा बोलविण्यात आली. अन्य सदस्यांप्रमाणे साने यांनीही कोरोना योद्ध्यांचे अभिनंदन केले आणि, ''कोरोना संशयित व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीचे प्रमाण वाढविण्यासाठी खासगी लॅबची मदत घ्यावी. वायसीएम व भोसरी रुग्णालयांतील डाॅक्टर, नर्स व अन्य कर्मचा-यांप्रमाणे सर्वच दवाखाने, रुग्णालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना सवलती द्याव्यात. गरिबांसाठी कम्युनिटी किचन पुन्हा सुरू करावेत.'' या मुद्द्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेतील व सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी एक सप्टेंबरपासून धन्वंतरी स्वास्थ्य योजना सुरू आहे. ती बंद करून वैद्यकीय विमा योजना लागू करण्याचा विषय होता. त्यावर साने यांनी मतदान घ्यायला लावले होते. तो विषय ३७ विरूद्ध २३ मतांनी सर्वसाधारण सभेत मंजूर झाला होता.‌मात्र त्यानिमित्ताने साने यांचा वचक सभागृहात दिसून आला होता. 

चार जूनचे शेवटचे भाषण

आज चार जुलै. बरोबर महिन्यापूर्वी म्हणजे चार जून रोजी महापालिका सर्वसाधारण सभा झाली होती. त्यात साने यांनी निसर्ग चक्रीवादळात झालेले नुकसान, प्रशासनाचे दुर्लक्ष, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क व साबण खरेदी याकडे लक्ष वेधून घेतले होते. हीच त्यांची शेवटची सभा ठरली. ''निसर्ग चक्रीवादळ येणार असल्याचे माहिती असताना प्रशासनाने उपाय योजना का केल्या नाहीत. झाडे पडली. घरांमध्ये पाणी शिरले. नागरिकांचे नुकसान झाले. हे रोखण्यासाठी प्रशासन झोपले होते का?'' असा सवाल साने यांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित केला होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान,  स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी यांना महापालिका भवनात झालेल्या मारहाणीचा मुद्दा महापालिका सर्वसाधारण सभेत उपस्थित झाला होता. त्यावर, ''मारहाणीची घटना का व कशी घडली? याच्या चौकशीसाठी सर्व पक्षीय सदस्यांची समिती नियुक्त करावी,'' अशी मागणी साने यांनी केली होती. दरम्यान, निसर्ग चक्रीवादळामुळे शहरात झालेल्या नुकसानीबाबत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. 'तुम्ही काहीही होऊ द्या, पण, सामान्य नागरिकांना त्रास होऊ देऊ नका,'' अशा शब्दांत साने यांनी आयुक्त, अन्य अधिकारी व सत्ताधारी भाजपला ठणकावून बजावले होते. तसेच, महापालिका प्रशासनाने केलेल्या मास्क व साबण खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला होता. ''मास्कचा दर्जा, किंमत  व साबण खरेदीचीही चौकशी करावी. फसवणूक करणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.'' अशी मागणी सुद्धा साने यांनी केली होती. हेच त्यांचे शेवटचे भाषण ठरले. कारण, २० जून रोजीची सर्वसाधारण सभा विषय नसल्याने रद्द करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com