
अमेरिकेत कॉस्मेटीक सर्जन असल्याची बतावणी करीत महिलेची साडेबारा लाखांची फसवणूक
पिंपरी : अमेरिकेत कॉस्मेटिक सर्जन असून, लग्नानंतर भारतात स्थायिक व्हायचे असल्याचे खोटे सांगून एका महिलेची साडेबारा लाखांची फसवणूक केली. हा प्रकार ऑनलाइन माध्यमातून घडला. याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अर्जुन गोपाल, शालिनी अय्यर, गोपाल यासह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
फिर्यादी महिला व आरोपी अर्जुन गोपाल याची मेट्रोमोनियल, डेटिंग अॅपच्या माध्यमातून ओळख झाली. त्यांनतर त्यांनी व्हॉट्सऍप कॉल, व्हिडिओ कॉल आणि मेलआयडीद्वारे एकमेकांशी संवाद साधला. त्यात आरोपी अर्जुन याने तो अमेरिकेत कॉस्मेटिक सर्जन असून, त्याला फिर्यादीसोबत लग्न करायचे असल्याचे तसेच, भारतात येऊन स्थायिक व्हायचे असल्याचे खोटे सांगितले. त्यानंतर आरोपी अर्जुन याने त्याच्या आईच्या डोक्याला दुखापत झाली असून, तिच्यावर उपचारासाठी बेंगलोर येथील शिनॉय फार्म येथील औषधी बियांचे औषध पाठविण्यासाठी एक लाख 29 हजार 900 रुपये भरण्यास फिर्यादीला भाग पाडले.
- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
त्यानंतर अर्जुनचे वडील गोपाल व फिर्यादी यांच्या वडिलांसोबत मिळून त्याच औषधी बियांचा भागीदारीमध्ये व्यवसाय कारण्याचे अमिष दाखवून, त्यापोटी सहा लाख 49 हजार 500 रुपये भरण्यास भाग पाडले. बनावट औषधी बिया देऊन त्या विकत घेण्यासाठी अमेरिकेतील एका कंपनीच्या परचेस मॅनेजरसोबत आपण भारतात येत असल्याचे सांगितले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दरम्यान, भारतात एअरपोर्टवर ग्रीन कार्ड नसल्याने पकडले असून तेथून सोडविण्यासाठी दंड म्हणून दोन लाख 70 हजार, आजारी असल्याचे सांगून 80 हजार रूपये घेतले. तसेच त्याच्यासोबत भारतात आलेल्या परचेस मॅनेजरने व्यवसायासाठी आणलेले डॉलर कस्टमने पकडल्याने ते सोडविण्यासाठी एक लाख रुपये देण्यास सांगितले. अशाप्रकारे वेगवेगळ्या कारणांसाठी आरोपी अर्जुन याने फिर्यादी महिलेला 12 लाख 29 हजार 400 रुपये वेगवेगळ्या बॅंक खात्यांवर भरण्यास भाग पाडले. ते पैसे त्याने परत न देता फिर्यादीसह त्यांच्या वडिलांची फसवणूक केली. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.