
एका प्रकरणातील संशयित तरुणाच्या भावासोबत पोलिस ठाण्यात पोलिसी गणवेशात आलेल्या तरुणीने आपण पोलिस असल्याचे सांगितले.
तोतया पोलिस तरुणीचा पोलिस ठाण्यात राडा
पिंपरी - एका प्रकरणातील संशयित तरुणाच्या भावासोबत पोलिस ठाण्यात पोलिसी गणवेशात आलेल्या तरुणीने (Girl) आपण पोलिस (Police) असल्याचे सांगितले. ‘त्या तरुणाचा शोध घेण्याचा काय अधिकार आहे, तुमची सीपी साहेबांकडे तक्रार करते, तुम्हाला बघून घेते’ असे म्हणत ठाण्यातच राडा घातला. अधिक चौकशी केली असता ती तरुणी तोतया असल्याचे समोर आले. हा प्रकार एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात घडला.
कविता प्रकाश दोडके (वय २७, रा. मोहननगर, चिंचवड) या तरुणीसह तिचा मित्र संतोष गंगाधर पोटभरे (वय २४, रा. बालाजीनगर, एमआयडीसी , भोसरी ) अशी अटक केलेल्यांची नाव आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई भागवत संदीपान शेप यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे रविवारी (ता. ८) रात्री पावणेदहाच्या सुमारास एका प्रकरणातील संशयित बाळू गंगाधर पोटभरे याचा शोध घेण्यासाठी भोसरीतील बालाजीनगर येथे गेले होते. तेथे संतोष याला त्याचा भाऊ बाळूचा पत्ता विचारला असता घर दाखवतो म्हणत तो गल्ली बोळातून पळून गेला. नंतर पुन्हा त्याच्याकडे बाळूबाबत विचारणा केली असता त्याने उलटसुलट उत्तरे दिली. त्याला ठाण्यात आणल्यानंतर त्याने कविताला बोलावून घेतले.
ती पोलिसांचा गणवेश परिधान करून ठाण्यात आली. ‘बाळू पोटभरे याच्या घरी पोलिस का गेले होते? त्याचा शोध घेण्याचा काय अधिकार आहे? मी पण पोलिस असून मला पोलिसांचे अधिकार माहीत आहेत, तुमच्याकडे बघून घेते’ असे म्हणत राडा घातला. कविता व संतोष हे दोघेही एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कामाला आहेत. तेथे त्यांची ओळख झाली.
हुबेहूब पोलिसाचा ‘लूक’
संतोषने फोन करताच कविता ही पोलिसांच्या गणवेशातच तेथे अवतरली. हुबेहूब पोलिस वाटेल असा ‘लूक’ तिने केला होता. सुरुवातीला खरे पोलिसही काहीसे चक्रावले. आपण मुंबई पोलिस दलात मरळ येथे कार्यरत असल्याचे ती सांगत होती. ओळखपत्र विचारले असता गणवेशात असल्यास ओळखपत्राची काय गरज आहे, असा प्रतिप्रश्न तिने पोलिसांना केला. दरम्यान, मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून खात्री केली असता कविता हीचा खरा चेहरा समोर आला.
खासगी कंपनीत नोकरी
पोलिस असताना ड्यूटीवर का नाही याबाबत विचारणा झाल्यास मी सध्या निलंबित असल्याचे ती सांगायची. तसेच पुन्हा रुजू होईपर्यंत खासगी कंपनीत काम करीत असल्याचीही बतावणी करायची.
दबाव आणण्यासाठी केला प्रकार
संतोषच्या भावाला वाचविण्यासाठी कविता हिने हा उद्योग केला. दरम्यान, तिने गणवेश कुठून आणला, याप्रकारे आणखी कुठे तोतयागिरी केली आहे का याचा शोध पोलिस घेत आहेत.
Web Title: Fraud Police Girl Police Station Crime Pimpri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..