कोट्यवधींचे कर्ज माफ होण्यासाठी केला मित्राचा खून; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात  

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 December 2020

'ब्लूटूथ'ने लागला आरोपीचा शोध; आत्महत्या करीत असल्याची लिहिली बनावट सुसाईड नोट 

पिंपरी : कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाल्याने एका कर्जबाजारी व्यक्तीने कर्जदारांना हुलकावणी देण्यासाठी भलतीच युक्ती लढवली. त्याने पंधरा वर्षांपूर्वी एकाच कंपनीत काम करत असलेल्या मित्राचा खून केला. मृतदेह अर्धवट जाळून तो मृतदेह आपलाच असल्याचे भासवण्यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर 'मी आत्महत्या करत आहे', असे लिहून ठेवले. मात्र, ही बनावट सुसाईड नोट सापडण्याआधीच हा बहाद्दर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मेहबूब दस्तागिर शेख (रा. राजवाडेनगर, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. संदीप पुंडलिक माईणकर (रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बंगलोर-मुंबई महामार्गावर बाणेर येथे मोकळ्या जागेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला. पोलिसांना मृताच्या खिशात अर्धवट जळालेली एक चिठ्ठी सापडली. त्यावरून मृताची ओळख पटल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल केला. मृत संदीप यांना दारूचे व्यसन होते. ते कुठेही फिरून मिळेल तिथे खाऊन कुठेही राहायचे. ते वल्लभनगर येथील शिवभोजन थाळी केंद्रावर जेवण करत होते. त्यामुळे पोलिसांनी शिवभोजन थाळी केंद्रापासून तपासाला सुरुवात केली. मात्र, त्यात पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या ब्ल्यूटूथच्या आधारे तांत्रिक तपास केला. ब्ल्यूटूथच्या मालक वाकड येथील असून, तो मागील काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार वाकड पोलिस ठाण्यात दाखल होती. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांच्या संशयाची सुई मेहबूब शेख या बेपत्ता व्यक्तीवर आली. त्याच्या नातेवाइकांकडे शोध सुरू केला. मेहबूब याला दोन पत्नी असून, त्याच्या पहिल्या पत्नीने तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. दुसरी पत्नी देखील बेपत्ता होती. मग पोलिसांनी या जोडीचा शोध सुरू केला. त्यावरून मेहबूब हा दिल्ली येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे एक पथक दिल्लीला गेले. मात्र, तो तिथून कुठेतरी गेला होता. त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत पुन्हा पुण्याला गेल्याचे समजले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, पोलिसांनी दौंड रेल्वे स्थानकावर सापळा रचून मेहबूब याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने सांगितले, की मनीषा, रामदास, अश्रफ नावाच्या व्यक्तींकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले. ते त्याच्याकडे कर्ज परत देण्यासाठी वारंवार तगादा लावत होते. त्यांचा तगादा टाळण्यासाठी त्याने एकाचा खून करून तो आपणच असल्याचे भासविले. त्याने 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर "मी कर्जबाजारी झालो असून, मी माझा शेवट करीत आहे. माझी बॉडी ही बाणेर भागातच मिळेल', असे लिहिले. तो स्टॅम्प पेपर स्वतःकडे ठेवला. मात्र, सुसाईड नोट प्रसारित करण्याआधीच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. 

दोघे होते मित्र 

संदीप व आरोपी पंधरा वर्षांपूर्वी हाफकिन कंपनीत कामाला होते. त्यानंतर दोघांनी कंपनी सोडली. संदीप कुठेही फिरायचे, त्यांच्याबाबत विचारणारे कोणी नाही, त्यामुळे मेहबूब याने संदीप यांची निवड केली. 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी मेहबूब आणि संदीप हाफकिन कंपनीच्या बाहेर भेटले. त्यानंतर मेहबूब आणि संदीप दुचाकीवरून बाणेरच्या दिशेने गेले. दरम्यान, मेहबूब याने संदीप यांचा खून करून दुसऱ्या पत्नीसोबत पसार झाला. 

...अन्‌ ब्ल्यूटूथ झाले कनेक्‍ट 

मृतदेहाजवळ सापडलेले ब्ल्यूटूथ आरोपीच्या मोबाईल फोनला कनेक्‍ट केले असता, ते लगेच कनेक्‍ट झाले. तसेच, त्या ब्ल्यूटूथचा चार्जर त्याच्या बॅगमध्ये सापडला. पोलिसांनी आरोपी मेहबूब याला अटक केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: friend murder for forgiven of billions of rupees at pimpri chinchwad