Friendship Day : पिंपरी-चिंचवडमध्ये असा सेलिब्रेट झाला 'मैत्री दिन' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या रविवारी (ता. 2) फ्रेंडशिप डेची पिंपरी-चिचंवड शहरात धमाल असते.

पिंपरी : 'जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते. आनंद दाखवायला हास्याची गरज नसते. दु:ख दाखवायला आसवांची गरज नसते. न बोलताच शब्दांमध्ये सारे समजते.' अशा भावानाप्रद शब्दांमध्ये मैत्री दिन घरीच साजरा झाला. या मैत्री दिनाला यंदा कोरोनाची नजर लागली अन्‌ तो केवळ ऑनलाइन शुभेच्छा मेसेजवरच सेलिब्रेट झाला. दरवर्षी गजबजणाऱ्या पिंपरी-चिंचवड बाजारपेठेत यंदा शुकशुकाट दिसून आला. तब्बल 80 टक्‍क्‍यांनी फ्रेंडशिप बॅंडची व्रिकी मंदावल्याचे दिसून आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या रविवारी (ता. 2) फ्रेंडशिप डेची पिंपरी-चिचंवड शहरात धमाल असते. मित्र-मैत्रिणींचे मिळून बरेच प्लॅन होतात. ठरावीक हॉटेल बुक करून एकत्रित सेलिब्रेशन केले जाते. आता मात्र, एकामागे एक सण-उत्सव घरीच साजरे होत आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसायही संकटात सापडला आहे. जेवणाचे बेतही रद्द होत आहेत. त्याचबरोबर दरवर्षी नव्याने रिलीज झालेला सिनेमा पाहण्याचाही तरुणाईचा प्लॅन असतो. चित्रपटगृह आजच्या दिवशी हाउसफुल झाल्याचे पहावयास मिळते.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरवर्षी आदल्या दिवशीच सिनेमांचे बुकिंग फुल होते. मात्र, चित्रपटगृहांनाही चांगलाच दणका बसला आहे. सहली व फेरफटक्‍यांचेही प्लॅन होतात. शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थी आपआपल्या कट्ट्यावर व कॅन्टीनमध्ये हा दिवस मजेत घालवतात. यंदा मात्र जुने क्षण तरुणाईने मोबाईलवर एकमेकांना शेअर केले. जुन्या आठवणींमध्ये काही जण रमले. 'कोरोना संपला की सेलिब्रेट करू' अशा घनिष्ट मैत्रीतून एकमेकांची समजूतही काढली. जवळपास राहणाऱ्या मित्र-मैत्रिणींनी एकमेकांना फ्रेंडशिप बॅंड बांधले. काहींच्या सोसायट्या व परिसर सील असल्याने घराबाहेर पडता आले नाही.

बाजारपेठेला मैत्री दिनाचाही फटका

पिंपरी-चिंचवडच्या बाजारपेठेतही बॅंड खरेदीसाठी तुरळक गर्दी होती. शाळा व महाविद्यालये बंद असल्याने दरवर्षी गजबजणाऱ्या बाजारेपठेत शुकशुकाट दिसून आला. अन्यथा तरुणांची ठिकठिकाणी बॅंड खरेदीसाठी झुंबड उडायची. बॅंडचे पूर्ण रोलच खरेदी केले जात असत. दहा रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंत बॅंडची मोठ्या प्रमाणात विक्री होत असे. यंदा मात्र, बाजारपेठही थंडावली होती. छोट्या मोठ्या विक्रेत्यांची हजारो रुपयांच्या कमाईवर पाणी फिरले. त्यांच्या पदरी निराशा पडली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: friendship day celebration online in pimpri chinchwad