नाणे मावळात गणेशोत्सवाची लगबग सुरू, बाजारपेठाही सजल्या 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 July 2020

  • ग्रामीण भागात गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध
  • वाहतूक खर्च वाढला 
  • लॉकडाउनमुळे गणेशमूर्तींच्या किंमती वाढल्या 

करंजगाव (ता. मावळ) : कोरोनामुळे गणेशोत्सवासह अनेक सण-उत्सव साजरे करण्यावर बंधने येणार आहेत, असे असले तरी नाणे मावळ परिसरात गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. कामशेत बाजारपेठेसह ग्रामीण भागातही गणेशमूर्तींची विक्री सुरू झाली आहे. त्याकरिता अनेक ठिकाणी दुकाने सजल्याचे चित्रआहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

नाणे, नवीन उकसान, करंजगाव आदी नाणे मावळातील गावांमध्ये गणेशमूर्ती विक्रीसाठी आणल्या आहेत. गावांमध्ये मूर्ती उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी लगेच नोंदणी करून घेतल्या आहेत, असे नाणेचे दुकानदार विजय खोंडे यांनी सांगितले.

मूर्तींच्या किंमती वाढल्या

गणेशमूर्तीसाठी लागणारा कच्चा माल हा प्रामुख्याने गुजरात, केरळ आणि राजस्थानमधून आणला जातो. यात काथ्या, प्लॅस्टर ऑफ पॅरिस, शाडूची माती, रंग यासारख्या घटकांचा समावेश असतो. वाहतूक खर्च वाढल्याने रंग, काथ्या, प्लॅस्टर ऑफ पॅरिस, शाडूची माती आदींच्या किंमतीत वाढ झाली आहे. याशिवाय लॉकडाउनमुळे कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच, रंगांचे भाव वाढले आहेत, असे मूर्तिकार विकास शिंदे यांनी सांगितले. या सगळ्याचा परिणाम किंमतीवर झाला आहे. दरम्यान, गणेशमूर्तीची निर्मिती करण्यासाठी प्रसिद्ध असलेले पेण व हमरापूर येथे कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी सतर्कता बाळगली जात आहे. तसेच, होलसेल विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनाच गणेशमूर्ती विकल्या जात आहे. गावात अनावश्यक गर्दी टाळून विक्री सुरू आहे.            

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पेणवरून मूर्ती आणता येईल का?

थेट कारखान्यातून मूर्ती आणल्यामुळे विविध प्रकारच्या मूर्ती पाहता येतात व आवडीनुसार मुर्ती खरेदी करता येते. तसेच, स्थानिक बाजारपेठेपेक्षा खूप कमी किंमतीत मूर्ती उपलब्ध होतात, अशी माहिती पेणवरून मूर्ती आणणाऱ्या नागरिकांनी दिली. परंतु, कोरोनामुळे नागरिकांना ही संधी मिळेल का, अशी शंका निर्माण झाली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh idols available for sale in nane maval