लोणावळ्यात असं होणार गणरायाचं विसर्जन

भाऊ म्हाळसकर
Sunday, 30 August 2020

गेले दहा दिवस मनोभावे पूजा केलेल्या गणेशाला निरोप देण्यासाठी लोणावळेकर सज्ज झाले आहे. मात्र, कोरोनामुळे मिरवणूक विरहित विसर्जन करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

लोणावळा (पुणे) : गेले दहा दिवस मनोभावे पूजा केलेल्या गणेशाला निरोप देण्यासाठी लोणावळेकर सज्ज झाले आहे. मात्र, कोरोनामुळे मिरवणूक विरहित विसर्जन करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. मंगळवारी (ता. 1) अनंत चतुर्दशीला विसर्जनासाठी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती नगराध्यक्षा सुरेखा जाधव व मुख्याधिकारी रवी पवार यानी दिली. 

मुळशी, पवनाच्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांचा चुकतोय काळजाचा ठोका

सध्या उद्भवलेल्या कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध आलेले आहेत. राज्य सरकारने या बाबत सविस्तर धोरण व नियम दिलेले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे मिरवणुकीस फाटा देत मनोभावे पूजा केलेल्या लाडक्‍या गणेशाचे शांततेत विसर्जन करण्याचे आवाहन सार्वजनिक गणेश मंडळांना करण्यात आले होते. मंडळांनीही सकारात्मक भूमिका घेत गणेश मूर्ती एका वाहनावर आरुढ करीत विसर्जन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भांगरवाडीतील मारुती मंदिरालगत इंद्रायणी नदीपात्रातील घाटाची नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता करण्यात आली आहे. विसर्जनप्रसंगी याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता, बांधकाम, आरोग्य खात्यासह विद्युत विभागातील कर्मचारी नेमण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंगळवारी येथील मावळा पुतळा चौकात विसर्जन मिरवणुकीत दुपारी तीन वाजता मंडळांनी पुजेच्या मूर्ती यात सहभागी कराव्यात व साधारण तासाभरात मिरवणूक समाप्त करावी, असे आवाहन मंडळांना करण्यात आले. प्रदूषण टाळत स्वच्छता व पावित्र्य राखण्यासाठी गणेशमूर्तीचे प्रतिकात्मक विसर्जन करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने डॉ. बी. एन. पुरंदरे विद्यालयाच्या मैदानात कृत्रिम हौदाची व्यवस्था करण्यात आली असून, नागरिकांनी याठिकाणी विसर्जन करावे, असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव व मुख्याधिकारी रवी पवार यांनी केले आहे. 

  • प्रत्येक मंडळांच्या पाच कार्यकर्त्यांनाच मिरवणूक पास 
  • स्वागत कक्ष उभारण्यास परवानगी नाही 
  • मावळ पुतळा ते इंद्रायणी घाट असे एकच मिरवणूक वाहनाचे नियोजन 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh idols immersion without procession in lonavla