esakal | लसीकरण करा, नाहीतर घरी बसा; कंपन्यांची सक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

लसीकरण करा, नाहीतर घरी बसा; कंपन्यांची सक्ती

sakal_logo
By
सुवर्णा गवारे-नवले

पिंपरी - सध्या लघु व सूक्ष्म औद्योगिक व असंघटित क्षेत्रातील कामगारांना कामावर येण्यासाठी कंपन्यांनी लस (Vaccine) घेण्याची सक्ती केली आहे. शहरात लशीचा पुरवठा अपुरा होत आहे, त्यामुळे लस कोठे मिळणार? हा मोठा प्रश्न कामगारांना (Worker) पडला आहे. तसेच, खासगी ठिकाणी लस टोचून घेणे त्यांना परवडणारे नाही. त्यात ‘लस टोचून घ्या, नाही तर घरी बसा’ असा फतवाच कंपन्यांनी काढला आहे. परिणामी, या अटीमुळे रोजगार हिरावण्याची भीती कामगारांमध्ये (Worker) निर्माण झाली आहे. (Get Vaccinated Otherwise Stay at Home Forcing Companies)

शहरात साडेसहा हजार कंपन्यांमध्ये हजारो कामगार काम करत आहेत. चार लाखांहून अधिक कंत्राटी कामगार आहेत. यातील बरेच कामगार परप्रांतीय व अकुशल गटातील आहेत. ‘ईएसआयएस’अंतर्गत आठ लाख कामगार आहेत. सर्वांचे पगार १० ते १५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. बऱ्याच जणांचा उदरनिर्वाह हा रोजच्या कामावर आहे. यामध्ये बांधकामावरील मजूर, घरेलू कामगार तसेच ठिकठिकाणी काम करणारे चतुर्थ श्रेणीतील कामगार व विविध ठिकाणी सेवा देणारे कामगार आहेत.

हेही वाचा: 55 आमदारांमध्ये मुख्यमंत्री बनू शकतो, तर 50 नगरसेवकांत महापौर का नाही? - राऊत

आयटी क्षेत्रातील बड्या कंपन्यांनी लसीकरणासाठी कॅम्प आयोजित केले. काहींनी खासगीमध्ये लस टोचून घेतल्या. आयटीयन्सने आपल्यापरीने मार्ग निवडले. त्यांच्या खिशाला ते परवडणारे होते. असा विरोधाभास सध्या शहरातील बड्या व लहान कंपन्यांमध्ये निर्माण झाला आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना लशीसाठी पायपीट करणे अवघड झाले आहे. बऱ्याच संघटनांनी कामगारांसाठी स्वतंत्रपणे लशीसाठी शिबिरे राबविण्याची मागणी केली आहे.

‘ईएसआयएस’कडून लसीकरणाची गरज

कामगारांसाठी आरोग्य विमा सेवेकडून (ईएसआयएस) लसीकरण योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. सध्या या योजनेअंतर्गत आठ लाखांच्यावर कामगार आहेत. सामाजिक सुरक्षिततेच्या गरजेपोटी ईएसआयकडून योजना राबविली जावी, असा सूर कामगारांमधून उमटत आहे.

कामगारांना सक्ती करणे चुकीचे आहे. काही कंपन्यांमधून असे प्रकार घडत आहेत. क्वालिटी सर्कलला लसीकरण केंद्र सुरू केले आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात कामगारांची सर्वाधिक संख्या आहे. एकत्रित काम करण्याने संसर्गाचा धोका अधिक वाढू शकतो. औद्योगिक क्षेत्राकरिता लशीसाठी स्वतंत्र नियमावली करणे गरजेची आहे.

- अभय भोर, अध्यक्ष, फोरम फॉर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन

आत्तापर्यंत लघु उद्योजकांमधून लशीची सक्ती केली नाही. एकीकडे कामगारांचा तुटवडा आहे, तर दुसरीकडे लस सक्तीची केल्यानंतर अवघड परिस्थिती निर्माण होईल. कामगार टिकविणे खूप मोठे आव्हान आहे. आतापर्यंत अशी कोणतीही तक्रार आलेली नाही.

- संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघु उद्योजक संघटना

आजारी पडला तर कंपनीमध्ये यायचे नाही, असे सांगितले आहे. लस टोचून घ्यावी असे वारंवार सांगितले जात आहे. परंतु, लशीसाठी बऱ्याच ठिकाणी विचारणा केल्यावर सरकारी केंद्रावर लस मिळत नाही. काही कंपन्यांमध्ये कामगारांना सुट्या घ्या असे सांगितले जात आहे. आम्हाला लस मिळावी एवढीच आमची मागणी आहे.

- इर्शाद शेख, कामगार, भोसरी

loading image