गिरवली घाट दुर्घटनेतील जखमी विद्यार्थीनींची पालकमंत्र्यांकडून विचारपूस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil

आंबेगाव तालुक्यात गिरवली घाट येथील बस दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांची पाटील यांनी गुरुवारी साईनाथ रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.

गिरवली घाट दुर्घटनेतील जखमी विद्यार्थीनींची पालकमंत्र्यांकडून विचारपूस

पिंपरी - साईनाथ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विद्यार्थीनींची पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मायेने, आस्थापुर्वक विचारपूस केली. घाबरू नको, लवकर बरी हो म्हणत त्यांनी हातातले चॉकलेट विद्यार्थीनीच्या हातात दिले. त्यामुळे काही वेळ वेदना विसरून त्या मुलींच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.

आंबेगाव तालुक्यात गिरवली घाट येथील बस दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांची पाटील यांनी गुरुवारी (ता. २९) साईनाथ रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. जखमी विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम उपचार करण्याच्या व आवश्यक सर्व आरोग्य सुविधा पुरविण्याच्या सूचना यावेळी पाटील यांनी डॉक्टरांना‌ केल्या.

आयुकाची दुर्बिण पाहण्यासाठी गेलेल्या पिंपळगाव घोडे येथील मुक्ताई प्रशालेच्या बसचा मंगळवारी (ता. २७) अपघात झाला. दुर्घटनेत किरकोळ जखमी विद्यार्थ्यांना उपचारांती पालकांकडे सोपविण्यात आले होते. पाच विद्यार्थी आणि चालकावर भोसरी येथील साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालकमंत्री पाटील यांनी जखमी विद्यार्थीनी आणि चालकाची भेट घेऊन त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. जखमींवर चांगले उपचार करण्याबाबत त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. उपचाराचा खर्च राज्य करणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना चांगल्यात चांगले उपचार द्यावेत, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना चॉकलेट, खाऊ देवून पालकमंत्र्यांनी मायेने विचारपूस केल्याने ही भेट त्यांच्यासाठी सुखद ठरली. यावेळी साईनाथ रुग्णालयाचे संचालक डॉ. सुहास कांबळे, भाजपचे गणेश भेगडे, अमोल थोरात, नामदेव ढाके, सदाशिव खाडे, ताराचंद कराळे आदी उपस्थित होते.