esakal | खडकीतील आरे दूध पॅकिंग ठप्प झाल्यामुळे घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय 
sakal

बोलून बातमी शोधा

खडकीतील आरे दूध पॅकिंग ठप्प झाल्यामुळे घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय 

- वीजपुरवठा खंडित असल्याने खडकी येथील शासकीय दूध योजनेचे (आरे) दूध संकलन, पॅकिंग आणि वितरण ठप्प झाले आहे.

खडकीतील आरे दूध पॅकिंग ठप्प झाल्यामुळे घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : वीजपुरवठा खंडित असल्याने खडकी येथील शासकीय दूध योजनेचे (आरे) दूध संकलन, पॅकिंग आणि वितरण ठप्प झाले आहे. त्यामुळे रमजान ईदनिमित्त कात्रज डेअरीत दूधाचे पॅकिंग करण्याचा निर्णय शासकीय दुग्धशाळेने घेतला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या वादळवाऱ्यामुळे खडकी येथील शासकीय दूध योजनेच्या आवारातील मोठे झाड तेथील वीज वितरण यंत्रणेवर कोसळले. तेव्हापासून योजनेच्या दुग्ध शाळेतील दूध संकलन, पॅकिंग आणि वितरण ठप्प झाले आहे. दरवर्षी रमजान ईदनिमित्त आरे दूधाला चांगली मागणी असते. त्यामुळे मुस्लिम बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून दुग्धशाळेने कात्रज डेअरीच्या सहकार्याने दूधाचे पॅकिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.      

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुग्ध शाळा व्यवस्थापक डी. पी. बनसोडे म्हणाले, "गेल्या वर्षी खास रमजान ईदनिमित्त दैनंदिन दूध वितरणापेक्षा अधिक १० ते १२ हजार लिटर आरे दूधाची मागणी होती. त्यानुसार दूध पुरवठा केला जात असे. मात्र, यावेळेस कोरोनाचा प्रादुर्भाव आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने दुग्ध शाळेमार्फत पॅकिंग  व्यवस्था सध्या बंद पडली आहे. येत्या १५ दिवसांत वीज यंत्रणेची दुरुस्ती होण्याची अपेक्षा आहे. मात्र, रमजान ईदनिमित्त दुधाची होणारी मागणी लक्षात घेता आम्ही आरे दूधाच्या पॅकिंगसाठी पुणे जिल्हा दूध संघ (कात्रज डेअरी)चे सहकार्य घेतले जाणार आहे.

शासकीय दूध योजनेमार्फत फक्त हवाबंद पिशव्यामधून आरे दूध २० ते २२ मे २०२० पर्यंत उपलब्ध करून दिले जाणार आहे. मशीद प्रमुख अथवा चालकांनी या तीन दिवसांतच सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत दुग्धशाळा व्यवस्थापक, शासकीय दूध योजना, मुंबई- पुणे महामार्ग, खडकी येथील कार्यालयात येऊन दूधाच्या मागणीचे ग्रास चलन काढून घ्यावे. तसेच राष्ट्रीयकृत बँकेत चलनाच्या रकमेचा भरणा करून त्याची पोहोच कार्यालयात जमा करावी. मागणीदाराला कात्रज डेअरी मधून दूध घेऊन जावे लागेल."

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

"शासकीय दूध योजनेद्वारे आम्हाला त्यांच्या दूधाचे पॅकिंग करण्याबाबत मागणी झाली आहे. त्यानुसार आम्ही त्यांना दूध पॅकिंगची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत." 
- डॉ. विवेक क्षीरसागर, व्यवस्थापकीय संचालक, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी) 


आरे दूध व्यवस्थेवर एक दृष्टीक्षेप :

  • शासकीय दूध योजनेच्या वीज यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी सुमारे १० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित. 
  • पुणे, पिंपरी चिंचवड शहर, पुणे, खडकी आणि देहूरोड कँटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात दूध वितरण
  • आरे दूधाचा दर ३६ रूपये प्रति लिटर (हवाबंद पिशवी) 
  • सुमारे १२५ दूधविक्री केंद्रचालक
  • एप्रिल महिन्यापर्यंत दररोजचे वितरण जवळपास १० हजार लिटर्स
  • टाळेबंदीपूर्वी ग्रामीण भागातील ओल्या चाऱ्याच्या समस्या, खासगी
  • सहकारी दूध संस्थांकडून शेतकऱ्यांकडील दूधाला चांगला दर मिळत असल्याने दूध संकलनात घट