डेंगी, चिकूणगुनियाचा वाढतोय प्रभाव;आरोग्य व वैद्यकीय विभागापुढे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आव्हान 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 January 2021

डेंगी व चिकूणगुनिया या साथीच्या आजारांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आव्हान आरोग्य व वैद्यकीय विभागापुढे आहे. 

पिंपरी - कोरोनाचा प्रभाव शहरात कमी होत असताना ऑक्‍टोबर महिन्यापासून डेंगी व चिकूणगुनिया या साथीच्या आजारांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आव्हान आरोग्य व वैद्यकीय विभागापुढे आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

गेल्या दहा महिन्यांपासून कोरोनाने शहराला पछाडले आहे. त्यामुळे महापालिकेच्या वायसीएमसह अन्य रुग्णालयेही कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवरील उपचारासाठी राखीव होते. मात्र, ऑक्‍टोबरपासून कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. रुग्णसंख्या घटल्याने नोव्हेंबरपासून वायसीएम रुग्णालय नॉन कोविड रुग्णांसाठी खुले केले. भोसरी, जिजामाता, तालेरा, थेरगाव, यमुनानगर, आकुर्डी, सांगवी ही रुग्णालयांमध्येही अन्य रुग्णांवर उपचार सुरू केले. या बाबतचा निर्णय अन्य साथरोगाचे रुग्ण आढळू लागल्याने महापालिकेच्या स्थायी समिती सभेने घेतला आहे. त्यानुसार उपचार सुरू आहेत. या साथ रोगांमध्ये डेंगी व चिकुणगुनियाचे रुग्ण सर्वाधिक आढळत असल्याचे महापालिकेकडील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यात डेंगीचे 208 व चिकुणगुनियाचे 260 रुग्ण आढळले आहेत. मार्चपासून सप्टेंबरपर्यंत सात महिन्यात डेंगीचे केवळ 28 व चिकुणगुनियाचे आठ रुग्ण शहरात होते. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

रुग्ण म्हणतात... 
सप्टेंबर महिन्यात माझ्या मुलाला कोरोना झाला होता. पंधरा दिवसांनी तो बरा होऊन घरी आला. त्यानंतर मुला त्रास सुरू झाला. आधी हात, पाय व डोके दुखत होते. नंतर सर्व अंग दुखायला लागले. दवाखान्यात गेल्यावर डॉक्‍टरांनी कोरोना टेस्ट करायला लावली. त्यावेळी खूप भीती वाटली. मुलाप्रमाणे आपल्याला कोरोना झाला की काय? असे वाटले. पण, आठ दिवसांनी रिपोर्ट आला. तो निगेटिव्ह होता. त्यामुळे अन्य तपासण्या केल्यावर कळले की चिकुणगुणिया आहे. खूप वेदना होत होत्या. आता बरं वाटतंय, असे काळेवाडीतील सुमनबाई हिवराळे या 67 वर्षीय आजी सांगत होत्या. 

दृष्टिक्षेपात रुग्ण 
महिना/डेंगी/चिकुणगुनिया 
ऑक्‍टोबर/61/48 
नोव्हेंबर/76/113 
डिसेंबर/71/99 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Growing influence of Dengue Chikungunya in Pimpri-Chinchwad city