एच. ए. स्कूल व्यवस्थापन विरोधात पालकांची सह्यांची मोहीम

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 February 2021

एच. ए. स्कूलमध्ये  गेल्या ५५ वर्षांपासून नाममात्र शुल्कामध्ये गरीब मुलांना शिक्षण दिले जाते. परंतु, कंपनी डबघाईला आल्याने शाळा व्यवस्थापन बदलण्यात येणार आहे. त्यास पालकांनी विरोध दर्शवत स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.

पिंपरी - एच. ए. स्कूलमध्ये  गेल्या ५५ वर्षांपासून नाममात्र शुल्कामध्ये गरीब मुलांना शिक्षण दिले जाते. परंतु, कंपनी डबघाईला आल्याने शाळा व्यवस्थापन बदलण्यात येणार आहे. त्यास पालकांनी विरोध दर्शवत स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत १२०० पालकांनी स्वाक्षरीव्दारे नापसंती दर्शविली आहे. तसेच, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. 

कंपनीने शाळेचे कामकाज पाहण्याची जबाबदारी १९६६ पासून डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे ९८ वर्षांच्या करारानुसार दिली आहे. ३० वर्षांचे प्रॉपर्टी कार्ड आहे. एच. ए. स्कूल नावाजलेले आहे. दहा वर्षांपूर्वी माजी विद्यार्थ्यांनी शाळेचा कायापालट केला. मात्र, आता कंपनीने शाळा विकण्यास काढली आहे. या प्रकारामुळे शिक्षक आणि पालक हतबल झाले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंग्लिश आणि मराठी माध्यम अशी प्री-प्रायमरी ते इयत्ता दहावीपर्यंत तीन हजार विद्यार्थी संख्या आहे. सत्तरहून अधिक शिक्षक-शिक्षिका आहे. अनेक शिक्षक उध्वस्थ होतील, असे पालकांचे म्हणणे आहे. पालक राजेंद्र पडवळ म्हणाले, ‘‘आम्हाला शाळा विकू द्यायची नाही. गरीब मुलांना नाममात्र शुल्कात इंग्रजी शिक्षण देणारी शहरातील ही एकमेव शाळा आहे. कंपनीने टेंडर मागे घेतले पाहिजे. लोकसहभागातून शाळेची सुधारणा केली. आता मात्र कंपनी विकायची तयारी दाखवत आहे.’’ पालक माधव जाधव म्हणाले, ‘‘गरज निर्माण झाल्यास कंपनीच्या विरोधात धरणे आंदोलन करणार आहे.’’ पालक राधा जाधव म्हणाल्या, ‘‘शाळा बंद करून मुलांचे मोठे नुकसान करत आहेत.़’’

वाहतूक कोंडीमुळे पिंपरी-चिंचवडकर हैराण

‘शाळा विकणार नाही; तर व्यवस्थापन बदलणार’
दरम्यान, केंद्र सरकारच्या हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एच.ए.) कंपनीअंतर्गत असलेल्या एच. ए. शाळेची विक्री होणार नाही, तर शाळेचे  केवळ व्यवस्थापन बदलण्यात येणार आहे. शाळेचे आर्थिक व्यवहार व वेळोवेळी होणारी शिक्षक व शिक्षकेतर भरती प्रकियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे कंपनीचे वित्त उपमहानिबंधक सी. व्ही. पुरम यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले. ही शाळा ९८ वर्षांच्या करारानुसार दिलेली आहे. मात्र, डेक्कन एज्युकेशन सोसायटीने २६ मे २०१२ रोजी कंपनीला दिलेल्या पत्रानुसार पूर्वप्राथमिक, प्राथमिक व माध्यमिकचे व्यवस्थापन आम्ही सुरू ठेवू इच्छित नाही. मात्र, ३ ऑक्टोंबर २०१३ मध्ये झालेल्या सल्लागार समिती बैठकीत शाळेची पर्यायी व्यवस्था जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचे सोसायटीने मान्य केले होते. १६ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या बैठकीत सोसायटीचे सचिव धनंजय कुलकर्णी यांनी या निर्णयाला दुजोरा दिला. या सर्व प्रक्रियेनंतर १७ जानेवारी २०२१ रोजी एच. ए. कंपनीने शाळा व्यवस्थापन बदलण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली.

कामशेतचा पूल सोशल मीडियावर पुन्हा ट्रोल; नागरिक विचारताहेत जाब

डेक्कन एज्युकेशन सोसायटीने शाळेचे कोणतेही रेकॉर्ड कंपनीला सादर केलेले नाही. करारानुसार कोणत्याही नियमांचे पालन केलेले नाही. शिवाय शाळेचा वार्षिक ताळेबंद विवरण वेळोवेळी सादर करणे अपेक्षित आहे. शिक्षक व शिक्षकेत्तर भरती करताना कंपनीच्या अधीन राहून नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कोणत्याही संघटना किंवा माजी विद्यार्थी यांच्याकडून कोटीहून अधिक आर्थिक व्यवहार करण्यात आले. मात्र, कंपनीला विचारात घेतले जात नाही. या कारणास्तव हा निर्णय घेतला आहे.  
- सी. व्ही. पुरम, उपमहानिबंधक, वित्त विभाग, एचए

हा करार मध्येच तोडता येत नाही. प्रयत्न समंजसपणे सुरू आहेत. १५ दिवसापूर्वी एच. ए.सोबत बैठक झाली. अंतिम निर्णय झाला नाही. अडचणीसाठी असा निर्णय घेणे अयोग्य आहे. अन्यथा कायदेशीर प्रक्रिया करून न्यायालयीन आधार घ्यावा लागेल. 
- डॉ. शरद कुंटे, अध्यक्ष,  डेक्कन एज्युकेशन सोसायटी

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HA Campaign of parents signatures against school management