पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर दिव्यांगांचा ठिय्या 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

'भारत माता की जय', 'कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहात नाही', अशा घोषणा दिव्यांग बांधवांनी दिल्या. 

पिंपरी : दिव्यांगांसाठी आरोग्य विमा तत्काळ लागू करावा. पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी पाच टक्के राखीव ठेवावा. कोरोनात दिव्यांगांना 10 हजार रुपयांची मदत करावी, अशा विविध मागण्यांसाठी महापालिका भवनासमोर सोमवारी (ता. 28) दिव्यांग बांधवांनी आंदोलन केले. 'भारत माता की जय', 'कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहात नाही', अशा घोषणाही त्यांनी दिल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

प्रहार अपंग क्रांतीतर्फे सकाळी अकराच्या सुमारास महापालिका भवनासमोर आंदोलनास सुरुवात झाली. "अपंगधारकांना स्टॉल संरक्षण मिळायला हवे', असे विविध फलक आंदोलकांनी हातात घेतले होते. या आंदोलनात नागरी हक्क कृती समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, प्रहार अपंग आंदोलनाचे राज्य उपाध्यक्ष अभय पवार, शहराध्यक्ष दत्ता भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाघचौरे, महिलाध्यक्षा संगीता जोशी, रामचंद्र तांबे, अमित तारे, रेवनाथ कर्डिले, प्रमोद घुले, विद्या तांदळे, सुनीता बिराजदार, रघुनाथ सावंत, शाहीद अत्तार आदींनी सहभाग घेतला. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भोसले म्हणाले, "दिव्यांग विभाग वेगळा करून सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती करण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी. प्रत्येक दिव्यांगाला साहित्य खरेदीसाठी 50 हजार रुपयांचे अनुदान द्यावे. विमा एजन्सीबरोबर चर्चा करून प्रस्ताव सादर करावा. अपंग स्टॉलधारकांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाते. परिणामी त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही. याची दक्षता घ्यावी.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Handicap agitation in front of Pimpri-Chinchwad Municipal Corporation building