आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे म्हणतायेत, 'कोरोनाविरुद्धची लढाई नक्की जिंकू' 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

  • आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या हस्ते वडगावात रुग्णवाहिकांचे लोकार्पण 

वडगाव मावळ : "कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेली 'माझे कुटुंब,माझी जबाबदारी' ही मोहीम प्रभावीपणे राबवावी. कोरोनाच्या या संकटाचा आपण एकत्रितपणे सामना करू व ही लढाई नक्कीच जिंकू,'' असा विश्‍वास राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी व्यक्त केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, उद्योजक अभय फिरोदिया व शंकरराव शेळके यांच्या वतीने मावळ तालुक्‍यातील रुग्णांच्या मोफत सेवेसाठी दिलेल्या दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण डॉ. टोपे यांच्या हस्ते सोमवारी येथे झाले. आमदार सुनील शेळके, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबूराव वायकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, जिल्हा परिषद सदस्या शोभाताई कदम, नगराध्यक्ष मयूर ढोरे, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, सुभाष जाधव, चंद्रजित वाघमारे,वैशाली दाभाडे, नारायण ठाकर, सुदाम कदम, अंकुश आंबेकर आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

डॉ. टोपे यांनी येथे सुरू करण्यात आलेल्या बहुउद्देशीय सुविधा केंद्रातील कामकाजाची पाहणी केली. रुग्णवाहिका व बेडची उपलब्धता, व्हेंटिलेटर व ऑक्‍सिजनची उपलब्धता, खासगी रुग्णालय बिल तपासणी आदी कक्षांना भेटी देऊन माहिती घेतली. या केंद्रात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे समाधान करा, अशी सूचना त्यांनी केली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही व्यापक मोहीम हाती घेतली आहे. ती यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या वेळी डॉ. टोपे यांच्या हस्ते माझे कुटुंब,माझी जबाबदारी मोहिमेसाठी आवश्‍यक वैद्यकीय सामग्री व साहित्य प्रातिनिधिक स्वरूपात नगरपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आले. नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्ष ढोरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. रुग्णांच्या सेवेसाठी या रुग्णवाहिकांची मोफत सेवा देण्यात येणार असल्याची माहिती आमदार शेळके यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health minister dr rajesh tope visit to vadgaon maval