esakal | पिंपरी परिसरात मुसळधार; रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी | Rain
sakal

बोलून बातमी शोधा

Pimpri Rain
पिंपरी परिसरात मुसळधार; रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी

पिंपरी परिसरात मुसळधार; रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी-चिंचवडसह परिसरात शनिवारी (ता. ९) विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. पावसाचा जोर इतका होता काही अंतरावरीलही स्पष्ट दिसत नव्हते. शनिवारी दिवसभर कडाक्याचे ऊन जाणवत होते. सायंकाळी पाचच्या सुमारास ढग दाटून येण्यास सुरवात झाली. त्यानंतर सहाला अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. काही वेळातच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. कामावरून सुटण्याच्या वेळेलाच जोरदार पाऊस बरसल्याने चाकरमान्यांची धांदल उडाली. अनेकजण रस्त्यातच अडकून पडले.

पावसामुळे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील ग्रेड सेपरेटरसह सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले.

हेही वाचा: Pimpri Update : शहरात तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू

भोसरीत नागरिकांची तारांबळ

भोसरी - भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर परिसरात शनिवारी (ता. ९) संध्याकाळी पाचच्या सुमारास पडलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची त्रेधा तिरपीट उडवली. जागोजागी रस्त्यावर जमा झालेल्या पावसाच्या पाण्यातून वाहने चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागली.

शनिवारी सकाळपासूनच वातावरणात उकाडा होता. दुपारी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. मात्र, संध्याकाळी मेघगर्जनेसह मुसळधार झालेल्या पावसामुळे सर्वच रस्ते आणि परिसर जलमय झाले होते. विशेषतः भोसरीतील पीएमटी चौक, पीसीएमसी चौक, गंगोत्री पार्कजवळील दिघी रस्ता, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह चौक, परिसरात पाणी जमा झाले होते.

दापोडी परिसरात पर्जन्यवृष्टी

जुनी सांगवी - जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू होती. कामावरून परत घराकडे जाणाऱ्या कामगार मंडळींची अचानक मोठ्या पावसाने तारांबळ उडाली. दापोडी येथील पुणे-मुंबई मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या भाई कोतवाल चौकात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. यातूनच वाहनचालकांना कसरत करत मार्ग काढावा लागत होता. सखल भाग व पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्याने येथील भागाला तळ्याचे स्वरूप आले होते.

loading image
go to top