पिंपरी-चिंचवड शहरात विजेच्या कडकडाटासह धो-धो पाऊस

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 September 2020

पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात मंगळवारी (ता. 8) विजेच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस सुरु आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात मंगळवारी (ता. 8) विजेच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस सुरु आहे. अचानक बरसलेल्या या पावसामुळे चाकरमान्यांची त्रेधातिरपिट उडाली. 

पिंपरी-चिंचवडकरांनो महत्त्वाची बातमी; गुरुवारी राहणार पाणीपुरवठा बंद 

सकाळपासूनच असलेल्या कडाक्‍याच्या उन्हामुळे अक्षरश: अंगाची लाहीलाही होत होती. मात्र, सायंकाळी पाचनंतर ढग दाटून आले. साडेपाच ते सहाच्या सुमारास विजांच्या कडकडासह शहराच्या विविध भागात पावसाला जोरदार सुरुवात झाली. रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांना काही अंतरावरीलही दिसेनासे झाले. त्यामुळे रेनकोट असतानाही अनेकांनी अडोसा शोधून एकाच जागी थांबणे पसंत केले. तसेच, कार्यालय सुटण्याच्या वेळेलाच पावसाला सुरुवात झाल्याने चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. निगडीतील टिळक चौक, काळभोरनगर, वल्लभनगर येथील भुयारी मार्ग, चिंचवड स्टेशन येथील सेंट मदर टेरेसा पुलाखालील सेवा रस्ता, कासारवाडीतील शंकरवाडी येथील भुयारी मार्ग आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले. तर शहराच्या काही भागात वीजपुरवठाही खंडित झाला. 

वाहतूक मंदावली 

रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्याचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडतोय. तर अनेक ठिकाणी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहनांचा वेगही कमी आहे. दरम्यान, पावसापासून बचाव करण्यासाठी सोबत रेनकोट नसल्याने तसेच समोरील स्पष्ट दिसत नसल्याने अनेक वाहनचालक रस्त्याच्या कडेला अथवा पुलाखाली थांबले. यामुळे काही रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rain in Pimpri Chinchwad city