पिंपरी-चिंचवड शहरात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची हजेरी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी दुपारी एक नंतर जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. कारण, सकाळपासून कडक ऊन होते. साधारणतः बारानंतर ढग दाटून आले आणि एकच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी दुपारी एक नंतर जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. कारण, सकाळपासून कडक ऊन होते. साधारणतः बारानंतर ढग दाटून आले आणि एकच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला आहे. अधूनमधून ढगांचा गडगडाटही ऐकायला येत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना व इंद्रायणी नद्यांची पाणी पातळीही कमी झालेली आहे. मुळा नदीवरील मुळशी धरण आणि पवना नदीवरील पवना धरणातून विसर्गही थांबविण्यात आला आहे. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून उकडा जाणवत होता. ऊन व उकाडा यामुळे घामाच्या धारा वाहत होत्या. आज सकाळपासूनही असेच वातावरण होते. दुपारनंतर मात्र पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पावसापासून बचाव करण्यासाठी पादचाऱ्यांनी दुकानांचा आसरा घेतला. दुचाकीस्वारांनी रस्त्याच्या कडेची झाडे, उड्डाणपुल, ग्रेडसेपरेटर व भुयारी मार्गांचा आसरा घेतला. काहींनी मात्र भिजण्याचा आनंद लुटत तशाच दुचाकी दामटल्या. सखल भागात पाणी साचल्यामुळे चिखल झाला होता. कामे सुरू असलेल्या ठिकाणी अधिक चिखल झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. असे चित्र रुपीनगर निगडी, नवी सांगवी, भोसरी, चऱ्होली भागात बघायला मिळाले. दरम्यान, पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी चौक- मोरवाडी चौक- एम्पायर इस्टेट पूल या दरम्यान मेट्रोचे काम सुरू आहे. पावसामुळे कामगारांनी काम थांबवून पिलरचा आसरा घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Pimpri-Chinchwad