esakal | हिंजवडी : आयटीनगरी परिसरातील कामगार वसाहती ठरताहेत कोरोना हॉटस्पॉट

बोलून बातमी शोधा

Coronavirus
हिंजवडी : आयटीनगरी परिसरातील कामगार वसाहती ठरताहेत कोरोना हॉटस्पॉट
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंजवडी - आयटीनगरी परिसरातील बांधकाम कामगारांसाठी तयार केलेल्या वसाहती कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांसह प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. विविध बांधकाम प्रकल्पांवर काम करणारे मजूर हे सात-आठ जण मिळून एकत्र राहतात, तसेच एकमेकांच्या सतत संपर्कात आल्याने संबंधित परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे.

दोन दिवसांपूर्वीच आयटीनगरी माणमधील बोडकेवाडी फाटा ते आर्किव्हल स्कूल दरम्यान रस्त्यालगतच्या कामगार वसाहतीत एकाचवेळी शंभरहून अधिक मजूर कोरोनाबाधित आढळले. या प्रकारामुळे ग्रामपंचायत प्रशासनासह तालुका प्रशासनही खडबडून जागे झाले. माण, हिंजवडी हद्दीतील विविध बांधकाम प्रकल्पांवर असलेल्या कामगार वसाहतीत सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. परिसर निर्जंतुक करण्यासाठी औषध फवारणीसह परिसर सील केला आहे. तसेच, सर्वच मजुरांची कोविड तपासणी करण्याचे काम सुरू केले असून, पॉझिटिव्ह आलेल्या मजुरांचा इतरांशी संपर्क आला होता का? ही माहिती संकलनाचे कामही आरोग्य यंत्रणा करत आहे.

हेही वाचा: वडगाव मावळ : एकाच कंपनीतील १६१ कामगारांचे अहवाल पॉझिटिव्ह

माण, हिंजवडी, मारुंजी, जांबे, नेरे दत्तवाडी परिसरात अनेक नामांकित व्यावसायिकांचे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. या ठिकाणी राज्यासह परराज्यातील हजारो मजूर दिवसरात्र काम करतात. येथे बहुसंख्य मजूर हे परराज्यातील असून, तात्पुरत्या पत्र्याच्या चाळी (वसाहती) तयार करून त्यांच्या निवासाची सोय कामाच्या ठिकाणी किंवा जवळपास केलेली आहे. आयटी परिसरात अशा अनेक अनधिकृत चाळी तयार झाल्याने हजारो परप्रांतीय मजूर याठिकाणी वास्तव्यास आहेत. हे कामगार खरेदीसाठी गावठाण आणि मुख्य बाजारपेठेत ये-जा करत असल्याने स्थानिक रहिवाशांसाठी ही चिंतेची बाब बनली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारी निर्णयानुसार, अशा मजुरांसाठी आवश्यक सर्व सोयीसुविधा, मास्क, सॅनिटायझर पुरवणे, शौचालय सुविधा, पिण्यासाठी शुद्ध पाणी, स्वच्छता, कोविड प्रतिबंधक लसीकरण, उपचार, समुपदेशन अशा पायाभूत उपाययोजना करणे बंधनकारक आहे. याकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.

हेही वाचा: आयटीआय बंद, तरी साहित्य खरेदीचा घाट; महापालिकेचा दुसरा प्रकार समोर

आरोग्य केंद्राच्या माध्यमातून परिसरात निर्जंतुकीकरण केले असून, परिसर सील केला आहे. बाधित मजुरांचा इतरांशी संपर्क असल्यास त्यांच्याही तपासणी सुरू आहे. ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिकांनी कामगारांना राहत्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरवणे बंधनकारक आहे. हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.

- संदीप जठार, गट विकास अधिकारी, मुळशी

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गावठाण, वाड्यावस्त्यांवर उपाययोजना सुरू आहेत. ग्रामस्थही चांगला प्रतिसाद देऊन सहकार्य करत आहेत. मात्र, काही बेजबाबदार बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदारांमुळे संपूर्ण गावाचे आरोग्य धोक्यात येत आहे. व्यावसायिक व ठेकेदारांनी सरकारी नियमांची काटेकोर पूर्तता करणे बंधनकारक आहे, यात कोणी हलगर्जीपणा केल्यास त्यांच्याविरुद्ध ग्रामपंचायतीतर्फे कारवाई करण्यात येईल.

- रवी बोडके, ग्रामपंचायत सदस्य, माण

कामगार वसाहतीत एकाचवेळी मोठ्या प्रमाणात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या परिसरात कंटेन्मेन्ट झोन केला असून, आरोग्य यंत्रणा त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहे. या कामगारांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन तपासणी केली जात आहे.

- डॉ. अजित कारंजकर, वैद्यकीय अधिकारी