
आयटीआय बंद, तरी साहित्य खरेदीचा घाट; महापालिकेचा दुसरा प्रकार समोर
पिंपरी - कोरोना संकटकाळी महापालिकेची औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) बंद आहे. तरीदेखील मध्यवर्ती भांडार विभागाने तारतंत्री व वीजतंत्री या दोन ट्रेडकरता ८ कोटीच्या साहित्य खरेदीचा घाट घातला आहे. टुल किट्स इक्विपमेंट मशिनरीसाठी निविदा प्रक्रीया राबविण्यात आली आहे. या विभागाचा कोरोना काळात अनावश्यक खरेदीचा दुसरा प्रकार समोर आला आहे.
कोरोना परिस्थितीत गेल्या वर्षापासून सर्व शिक्षण संस्था, औद्योगिक व्यावसायिक शिक्षण संस्था, विविध विभाग बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. सध्याचा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आयटीआय सुरू होतील यात शंका आहे. अशा परिस्थितीमध्ये मध्यवर्ती भांडार विभागाने महापालिकेच्या आयटीआयमधील वीजतंत्री व तारतंत्री ( विभाग अ व ब ) या व्यवसायाकरिता आवश्यक टुल किट्स, इक्विपमेंट, मशिनरी साहित्य खरेदीचा घाट घातला आहे.
हेही वाचा: पिंपरी : चिखलीत संचारबंदी दरम्यान दुकानं खुली; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण
साहित्य पुरवठा करून ‘टर्न की प्रोजेक्ट’ कार्यान्वित करून घेण्यासाठी इच्छुक उत्पादित कंपनी अथवा पुरवठाधारक यांच्याकडून निविदा मागवित प्रक्रीया राबवली. त्यापैकी एक ६, ४२, ७७, २७२ रुपयांची निविदा प्रसिद्ध करून ता. २२.०१.२०२१ ते ११.०२.२०२१ या काळात प्रक्रिया राबविण्यात आली, तर दुसरी २, ०१, ७७, ४२२ रुपयांची निविदा प्रसिद्ध करून ता.१०.०३.२०२१ ते २६.०३.२०२१ या काळात प्रक्रिया राबविण्यात आली. शहरातील नागरिकांच्या वैद्यकीय व आरोग्य सुविधा वर खर्च करण्यासाठी महापालिकेची तारेवरची कसरत सुरू आहे. दुसरीकडे मात्र अशा शाळा-महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था बंद असताना भांडार विभागाकडून अनावश्यक खरेदी नेमकी कोणासाठी केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Web Title: Iti Closed Material Procurement Ferry In Front Of The Second Type Of
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..