esakal | हिंजवडी आयटी पार्क परिसरात लॅपटॉप चोरणारी टोळी गजाआड
sakal

बोलून बातमी शोधा

हिंजवडी आयटी पार्क परिसरात लॅपटॉप चोरणारी टोळी गजाआड

18 लॅपटॉप जप्त; मोटारीच्या काचा फोडून करायचे चोरी

हिंजवडी आयटी पार्क परिसरात लॅपटॉप चोरणारी टोळी गजाआड

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : हिंजवडी आयटी पार्क परिसरात लॅपटॉप, कॉम्पुटर वापरणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे चोरट्यांनी देखील लॅपटॉप चोरीसाठी या परिसरालाच टार्गेट करीत मोटारीच्या काचा फोडून लाखो किमतीचे लॅपटॉप लंपास केले. अखेर ही टोळी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाच्या जाळ्यात अडकली. उघडकीस आलेल्या 13 गुन्ह्यांपैकी तब्बल सात गुन्हे हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असून, या टोळीकडून 18 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

गणेश ऊर्फ नाना माणिक पवार, बबन काशिनाथ चव्हाण (वय 39, रा. तिऱ्हे, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर), बसू जगदीश चव्हाण (वय 45, रा. ससाणे नगर रोड, सुरक्षा नगर, हडपसर), अमोल साहेबराव गुंड (रा. शिवनी, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर), सुलेमान याकूब तांबोळी (रा. विष्णूनगर, कुमठा नाका, सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे असून, राजेश प्रकाश चव्हाण (वय 35, रा. अंबुजवाडी, मालवणी, मालाड, मुंबई), मारुती मानी पवार (वय 40, रा. पाणी ईपरगा तलाव, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) हे फरारी आहेत. 

मिलिंद वेदव्यास राळेगावकर (रा. सूसगाव) यांनी 6 ऑक्‍टोबरला दुपारी अडीचच्या सुमारास बेंगलोर-मुंबई महामार्गावरील सेवा रस्त्यावर त्यांची मोटार पार्क केली होती. त्यावेळी अज्ञात आरोपींनी मोटारीची काच फोडून मागील सीटवरील पन्नास हजारांची रोकड असलेली बॅग लंपास केली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने घटनास्थळाजवळील एका कंपनीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता, एक दुचाकी संशयितरित्या फिरत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासून दुचाकीचा नंबर निष्पन्न केला. या नंबरद्वारे दुचाकीधारकाचा शोध घेतला असता ही दुचाकी गणेश ऊर्फ नाना माणिक पवार हा वापरत असून, तो मुंबई येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नवी मुंबई येथून पवार याला ताब्यात घेतले. त्यानंतर बबन चव्हाण व बसू चव्हाण हे त्याचे साथीदार असल्याचे समोर आले. त्यानुसार बसू चव्हाण याला हडपसर येथून तर बबन चव्हाण याला सोलापूर येथे एका शेतातून ताब्यात घेतले. या आरोपींकडे सखोल तपास केला असता, त्यांनी राजेश प्रकाश चव्हाण, मारुती पवार यांच्यासह पुणे व पिंपरी-चिंचवड शहर परिसरात मागील एक ते दीड वर्षात 25 ते 30 गाड्यांच्या काचा फोडून लॅपटॉप, रोख रक्कम व इतर साहित्याची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या आरोपींनी चोरलेले लॅपटॉप हे सोलापूर जिल्ह्यात विक्री केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सोलापूर येथे जाऊन त्यांच्याकडून माल विकत घेणारे अमोल साहेबराव गुंड व सुलेमान याकूब तांबोळी यांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 18 महागडे लॅपटॉप व तीन वाय-फाय डोंगल जप्त केले. यासह अनेक लॅपटॉप हे आरोपींचे फरारी साथीदार राजेश चव्हाण व मारुती पवार यांनी मुंबईमध्ये विक्री केल्याचेही निष्पन्न झाले आहे. 

या आरोपींकडून 18 लॅपटॉप, तीन वाय-फाय डोंगल, एक कॅमेरा लेन्स, लॅपटॉपच्या सात रिकाम्या बॅग, दोन दुचाकी, गाडीची काच फोडण्यासाठी वापरत असलेले साहित्य, असा एकूण 12 लाख 77 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत हिंजवडी ठाण्यातील सात, वाकड तीन, हडपसर दोन व बंडगार्डन पोलिस ठाण्यातील एक, असे एकूण गुन्हे उघडकीस आले आहेत. 

आरोपींकडे मिळालेल्या 18 लॅपटॉपपैकी सहा लॅपटॉपचे मूळ मालक मिळाले असून, 12 लॅपटॉपचे मालक अद्याप मिळालेले नाहीत. तरी गाडीची काच फोडून लॅपटॉप चोरीला गेलेल्या व्यक्तींनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

आरोपी आहेत सराईत गुन्हेगार 

गणेश पवार याच्यावर मुंबई येथे 24 गुन्हे दाखल असून, तो डिसेंबर 2019 मध्ये ख्रिसमस कालावधीत त्याच्या साथीदारांसह गोवा येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले आहे. तेथेही त्यांनी अशाप्रकारचे गुन्हे केल्याचे समोर आले आहे. याबाबत गोवा पोलिसांशी संपर्क साधला असून, पुढील तपास करीत आहेत. तसेच बसू चव्हाण याच्यावर मुंबई व पुणे शहरात एकूण 14 गुन्हे दाखल आहेत. त्यास मुंबईतून तडीपार केल्यानंतर तो पुण्यात वास्तव्यास आला होता. तसेच राजेश पवार याच्यावर नऊ, तसेच मारुती चव्हाण याच्यावर 13 गुन्हे दाखल आहेत. 

अशी करायचे चोरी 

दुचाकीवरून येऊन पार्क केलेल्या गाडीची पाहणी करायची. संबंधित व्यक्ती किती वेळात परतेल, याचा अंदाज घ्यायचा. स्क्रू ड्रायव्हरने मोटारीची काच खोलून आतील माल लंपास करायचा. चोरी करताना लॅपटॉप चोरण्याला अधिक प्राधान्य देत.