ऊसाच्या ट्रॉलीखाली येऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी; सुदैवाने मोठी हानी टळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

चालकाचा ताबा सुटल्याने ऊस वाहणारा ट्रॅक्टर रस्ता सोडून लोकवस्तीत शिरला दैव बलवत्तर म्हणून तसेच प्रसंगावधान राखत आजूबाजूच्या लोकांनी पळ काढल्याने अनेकांचे प्राण वाचले.

Accident : ऊसाच्या ट्रॉलीखाली येऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी; सुदैवाने मोठी हानी टळली

हिंजवडी - चालकाचा ताबा सुटल्याने ऊस वाहणारा ट्रॅक्टर रस्ता सोडून लोकवस्तीत शिरला दैव बलवत्तर म्हणून तसेच प्रसंगावधान राखत आजूबाजूच्या लोकांनी पळ काढल्याने अनेकांचे प्राण वाचले. मात्र, दुर्दैवाने एक दुचाकीस्वार ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून गंभीर जखमी झाला. हा विचित्र अपघात नेरे दत्तवाडी-मारुंजी रस्त्यावर ढमाले नगर चौकात मंगळवारी (ता. १५) दुपारी एकच्या सुमारास झाला.

जीतेश भगवान पती (वय. ४५, रा. किवळे) असे या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने डोक्याला गंभीर जखम झाली तर दोनही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. त्यांची तब्येत नाजूक आहे. या घटनेनंतर पसार झालेल्या चंद्रकांत धोंडिबा चेंडके (वय. ३५, रा. मरकळ, खेड) या ट्रॅक्टर चालकावर हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचा सर्व थरार सीसीटीव्हीत पाहिला तर अंगावर शहारे येतात. सेकंदात या ठिकाणी दोन ते तीन वाहनांचा चुराडा झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून मोठी हानी टळली.

याबाबत माहिती अशी, नेरे-दत्तवाडी येथील ढमाले नगर चौकात मारुंजीच्या दिशेने कासारसाईकडे जाताना तीव्र उतार व वळण आहे. समोरून वळणाऱ्या मोटार चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने ट्रॅक्टरचे संतुलन बिघडले आणि तो गर्रकन वळला. याठिकाणी वारंवार लहान मोठे अपघात होतात. ढमाले नगर परिसरात शाळा व दाट लोकवस्ती असल्याने या चौकात कायमच वर्दळ व रहदारी असते. सध्या कासारसाई येथील साखर कारखान्याचे गाळप सुरू असल्याने ऊस वाहतूक वाहनांची व कासारसाई धरणावर फिरायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे.

खरा दोषी कोण?

या अपघाताचे सीसी टीव्ही फुटेज समोर आले असून यात येथून एक मोटार उजवीकडे वळण्याच्या नादात असताना अचानक ब्रेक लावतो आणि त्याला वाचविण्यासाठी ट्रॅक्टर चालक अर्जंट ब्रेक लावतो यात त्याचे संतुलन बिघडते असे स्पष्ट दिसत आहे त्यामुळे नेमका दोष कोणाचा आणि अपराधी कोण? याबाबत पोलिसांनी फेरविचार करण्याची गरज असल्याची चर्चा परिसरात आहे. या रस्त्यांवर गतिरोधक बसविण्याची मागणी अनेक महिन्यांपासून होत आहे. परंतु प्रशासन या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे गतिरोधक बसवावा अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे ग्रामस्थ व पोलीस मित्र संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष संदीप जाधव यांनी सकाळशी बोलताना सांगितले.