Video : वाह! याला म्हणतात छंद; पिंपळे सौदागरातील खेळाडूची ही आगळीवेगळी आवड बघाच

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 June 2020

कोणाला जुनी नाणी अथवा टपाल तिकिटे जमा करण्याचा छंद असतो. तर कोणाला भटकंती करण्याचा.

पिंपरी : कोणाला जुनी नाणी अथवा टपाल तिकिटे जमा करण्याचा छंद असतो. तर कोणाला भटकंती करण्याचा. मात्र, पिंपळे सौदागर येथील माजी टेबल टेनिसपटू चंदर थवानी यांना देश-विदेशातील दिग्गज टेबल टेनिसपटूंच्या स्वाक्षऱ्या जमा करण्याचा छंद असून, त्यांनी आतापर्यंत सुमारे शंभरहून अधिक दिग्गज टेबल टेनिस खेळाडूंच्या रॅकेट अथवा चेंडूवर स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी कॅम्प येथील जयहिंद कनिष्ठ महाविद्यालय आणि पुढे मंघनमल उधाराम (एमयू) महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना थवानी यांना टेबल टेनिस खेळाची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्यानंतरच्या कालखंडात व्यवसायाकडे त्यांना अधिक लक्ष द्यावे लागल्याने त्यांना खेळापासून दूर जावे लागले. हॉंगकॉंगमध्ये व्यवसायानिमित्त सुमारे दहा वर्षे व्यतीत करताना थवानी हे परत टेबल टेनिसच्या जवळ आले. काही आंतरराष्ट्रीय स्पर्धा जवळून पाहता आल्या. त्यामुळे दिग्गज खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या जमा करण्याचा त्यांना छंद लागला. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबद्दल बोलताना थवानी म्हणाले, "साधारणतः 2000 पासून टेबल टेनिस खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यास सुरुवात केली. चीनची अव्वल खेळाडू झांग यिनिंग हिची 2004 मध्ये महिला विश्‍वचषक स्पर्धेनिमित्त पहिली सही घेतली. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे 90 आंतरराष्ट्रीय दिग्गज खेळाडू आणि 10 राष्ट्रीय खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत. या सर्व स्वाक्षऱ्या टेबल टेनिसच्या रॅकेट आणि चेंडूवर घेतल्या आहेत. माझ्याकडे असे एकूण 8 रॅकेट आणि 6 चेंडू आहेत. आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये मा लीन, वांग नान (चीन), थे याना (हॉंगकॉंग), किंग युंग आ (कोरिया), बोरोस तमारा (क्रोएशिया), बडेसकू ओटिलिया (रोमानिया) आदींचा समावेश आहे. तर राष्ट्रीय खेळाडूंमध्ये अचंता शरद कमल, एस. गनसेखरन, हरमित देसाई, मानव ठक्कर, अमल राज, सनील शेट्टी महिलांमध्ये मनिका बत्रा, मधुरिका पाटकर, मोमा दास आदी खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

थवानी यांनी आतापर्यंत आयटीटीएफ वर्ल्ड टूर हॉंगकॉंग ओपन, आयटीटीएफ वर्ल्ड टूर प्लॅटेनियन चायना ओपन, आयटीटीएफ चॅलेंज इंडोनेशिया ओपन आदी एकंदरित 20 टेबल टेनिस स्पर्धा जवळून पाहिल्या आहेत. कोरिया येथील यावर्षीच्या वर्ल्ड टेबल टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेसाठी जाण्याचा त्यांचा विचार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hobby of collecting signatures of table tennis players by chandar thavani pimpale saudagar