घर मालकाने रुग्णाला आयसोलेट होण्यास दिला होता नकार, मग हा हिसका दाखवला अन्...

घर मालकाने रुग्णाला आयसोलेट होण्यास दिला होता नकार, मग हा हिसका दाखवला अन्...

पिंपरी : लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना होम आयसोलेट होता येते. मात्र, त्यासाठी रुग्णासाठी स्वतंत्र खोली असावी. त्याला टॉयलेट व बाथरूम अटॅच असावे, अशी अट आहे. असे सर्व असताना पिंपरी गावातील एका घर मालकाने भाडेकरू असलेल्या रुग्णाला होम आयसोलेट होण्यास विरोध केला. त्यामुळे रुग्णाला पुन्हा वायसीएम रुग्णालयात जाण्याची वेळ आली. याबाबत महापालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. अधिकाऱ्यांनी घरमालकाशी संपर्क साधला. तरीही ते ऐकत नसल्याचे लक्षात आल्याने गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आणि घरमालकाने नमते घेतले. अखेर संबंधित रुग्णाला होम आयसोलेट करण्यात आले. 

पिंपरी गावातील तपोवन मंदिर परिसर. येथील एका व्यक्तीला कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यांच्यावर दोन दिवस वायसीएम रुग्णालयात उपचार केले. त्यानंतर बालेवाडीतील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले. त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. शिवाय, त्यांच्याकडे होम आयसोलेटची व्यवस्था होती. त्यामुळे महापालिकेने उपचाराला पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर आणि रुग्णाला कोणताही त्रास होत नसल्याने घरी आयसोलेट होण्यासाठी कोविड केअर सेंटरमधून डिस्चार्ज दिला. त्यांना 14 दिवस होम क्वारंटाइन राहण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार संबंधित रुग्ण घरी अर्थात थ्री बीएचके फ्लॅटमध्ये आला. मात्र, घर भाडेतत्वावरील होते. घर मालकाने रुग्णाला घरात जाऊ देण्यास नकार दिला. महापालिकेने होम आयसोलेट होण्याची परवानी दिली आहे, असे सांगून कागदपत्रे रुग्णाने दाखविले. तरीही, घरमालक ऐकण्यास तयार नव्हता. निगेटिव्ह रिपोर्ट असल्याशिवाय इमारतीत येऊ देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे रुग्णाला इमारतीबाहेर थांबावे लागले. अनेकांनी समजूत काढूनही मालक ऐकण्यास तयार झाला नाही. अखेर रुग्णाला पुन्हा वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. महापालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यांनी घरमालकाशी संपर्क साधला. गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. त्यानंतर घरमालकाने माघार घेत रूग्णाला घरात प्रवेश दिला. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले...

शहरातील रुग्ण संख्या वाढत आहे. लक्षणे, गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांसाठी बेडची आवश्‍यकता आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे, मात्र, लक्षणे काहीच नाहीत. अशा रुग्णांना होम आयसोलेट होता येते. रुग्णामध्ये व्हायरस कमी झाल्यानंतर प्रकृती गंभीर होऊ शकत नाही, अशी खात्री झाल्यास सरकारच्या निर्णयानुसार त्या रुग्णांना होम आयसोलेट ठेवता येते. ज्यांच्याकडे स्वतंत्र खोली आहे. घरातील केअर टेकर आहे. अशा रुग्णांना होम आयसोलेटला परवानगी आहे. त्यामुळे घर मालकांनी विरोध करू नये. विरोध करणाऱ्या पुण्यातील एका घरमालकाविरोधात दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला आहे. अशीच कारवाई शहरातही होऊ शकते. त्यामुळे घरमालकांनी सहकार्य करावे. अन्यथा गुन्हा दाखल केला जाईल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com