esakal | हॉटेल, रेस्टॉरंट सुरू; मात्र संकष्टीमुळे मांसाहार करणाऱ्यांचा हिरमोड
sakal

बोलून बातमी शोधा

हॉटेल, रेस्टॉरंट सुरू; मात्र संकष्टीमुळे मांसाहार करणाऱ्यांचा हिरमोड
  • खवय्यांची पावले वळली हॉटेलकडे 
  • हॉटेल व्यावसायिकांचे चेहरे खुलले 

हॉटेल, रेस्टॉरंट सुरू; मात्र संकष्टीमुळे मांसाहार करणाऱ्यांचा हिरमोड

sakal_logo
By
सुवर्णा नवले

पिंपरी : "हॉटेलच्या जेवणाचा आस्वादच निराळा असतो. घरचं जेवण करूनही हॉटेलमध्ये गेल्याशिवाय चैन पडत नाही. मांसाहाराची तर मज्जाच निराळी असते. एकदा तरी आठवड्यातून बाहेरच्या जेवणावरही आम्ही ताव मारतोच. हॉटेलमधल्या विविधरंगी डिश, थाळीची सजावट, चमचमीत जेवण पाहूनच तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. सहा महिन्यानंतर निवांतपणे बसून आज जेवणाचा आस्वाद घेतोय. अगदी हलकं वाटतंय. परंतु, पुरेशी काळजी घेऊन आम्ही कुटुंबीयांसोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी बाहेर पडलो आहोत," असं चिंचवडमधील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेले निलेश भूमकर सांगत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अनलॉकनंतर हॉटेल-रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू झाले. पिंपरी-चिंचवडमधल्या मोठ्या हॉटेलमध्ये काहीप्रमाणात सोमवारी (ता. 5) गजबज दिसली. संकष्टी चतुर्थी असल्याने मांसाहाराची हॉटेल बंद होती. बऱ्याच दिवसानंतर हॉटेल सुरू झाल्याने व्हेज हॉटेलला वर्दळ कमी होती. मात्र, हॉटेल व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. व्यवसायाच्या ओढीने व पुन्हा नव्याने जम बसविण्यासाठी प्रत्येक जण लगबग सुरू होती. बऱ्याच जणांना पार्सलच्या जेवणाची सवय लागल्याने पार्सलवरच भर दिसून आला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

खवय्यांच्या सुरक्षेसाठी हॉटेलच्या दरवाजात सॅनिटायजर व थर्मल गन मशीन ठेवले आहेत. काटेकोरपणे तापमान तपासले जात होते. त्यानंतर प्रत्येकी एक टेबल सोडूनच दुसऱ्या टेबलवर ग्राहकांना बसविले जात आहे. जेवणापूर्वी गरम पाण्याने हात धुण्याच्या सूचनाही वेटर देत आहेत. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांनी मास्क व हॅंण्डग्लोव्हज लावून जेवणाच्या ऑर्डर स्वीकारल्या. प्रत्येक ग्राहकाच्या जेवणानंतर टेबल व खुर्च्या सॅनिटाइज केल्या जात आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्येष्ठ नागरिक पूजा कुलकर्णी म्हणाल्या, "घरात आता बसवत नाही. कित्येक दिवसांनी हॉटेलच्या जेवणाचा आस्वाद घेतला. पुरेशी काळजी आम्ही घेतली. आवडत्या डिशचाही आनंद लुटला. कोरोनाने जगणं हैराण केलं होतं. थोडी मोकळीक मिळाल्यासारखं वाटत आहे." 

हॉटेल व्यवस्थापक प्रमोद जाधव म्हणाले, "सकाळपासून सर्व हॉटेल कर्मचाऱ्यांना स्वच्छतेच्या वारंवार सूचना दिल्या आहेत. नेहमीपेक्षा गर्दीचे नियम पाळले जाणार आहेत. हॉटेलमध्ये नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित आहे. जबाबदारीने वागायला हवे. गर्दी न करता सोशल डिस्टन्स ठेवणे अपेक्षित आहे."