
पत्नीच्या मानलेल्या भावाला मारण्यासाठी पतीने कारागृहातून दिली सुपारी
पिंपरी - पत्नीच्या मानलेल्या भावाला मारण्यासाठी पतीने कारागृहातून एकाला सुपारी दिली. त्याप्रमाणे कारागृहातून सुटलेल्या आरोपीने महिलेच्या मानलेल्या भावाला मारहाण केली. हा प्रकार भोसरीतील गावजत्रा मैदान येथे घडला.
याप्रकरणी अमित बाळासाहेब भालेराव (रा. सिद्धेश्वर शाळेजवळ, दिघी रोड, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुपेश पाटील व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल झाला आहे. गुरुदत्त उर्फ बाबा अशोक पांडे (रा. दिघी रोड, भोसरी) याच्याशी अमितची लहानपणापासून ओळख आहे. गुरुदत्तच्या पत्नीला अमित बहिण मानतो. दरम्यान, गुरुदत्त हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याला साडेतीन वर्षापूर्वी भोसरी पोलिसांनी मोक्काच्या गुन्ह्यात अटक केली आहे. तेव्हापासून तो कारागृहात आहे. तर आरोपी रुपेश पाटील हा पूर्वी भोसरी येथे राहत होता.
चार महिन्यांपूर्वी पोलिसांनी रुपेशला काही गुन्ह्यांमध्ये अटक केली. त्यानंतर त्याचीही येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. एक आठवड्यापूर्वी तो कारागृहातून सुटला. दरम्यान, बुधवारी (ता . १८) अमित गावजत्रा मैदान भोसरी येथे बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेले. त्यावेळी रुपेश तिथे आला. 'मला बाबा पांडे याने तू त्याच्या बायको बरोबर फिरतो म्हणून तुला मारायला सांगितले आहे', असे म्हणत रुपेश व त्याच्या साथीदारांनी अमित यांना शिवीगाळ करीत दगडाने मारहाण केली. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Husband Gave Order From Jail To Kill His Wifes Supposed Brother Crime
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..