पिंपरी-चिंचवडमध्ये 'या' राजकीय पदाधिकाऱ्यांना घ्यावा लागतोय दैवतांचा 'आधार' ?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

महापालिका भवनात पदाधिकाऱ्यांच्या दालनात मूर्ती अन्‌ प्रतिमा 

पिंपरी : गुरुवार, सकाळचे अकरा वाजलेले. महापालिका भवनातील तिसरा मजल्यावरील विरोधी पक्ष नेत्यांचे दालन. अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता. आत डोकावून पाहिले, दैवतासमोर अगरबत्ती लावलेली होती. दरवाजावर फुलांचे तोरण होते. महापौर, उपमहापौरांसह पक्षनेते, स्थायी समिती सभापती व अन्य पदाधिकाऱ्यांच्या दालनातही कोणत्या ना कोणत्या दैवतांची मूर्ती व प्रतिमा आढळल्या. त्यामुळे राजकीय पदाधिकाऱ्यांना दैवतांचा आधार घ्यावा लागतोय की काय? असा प्रश्‍न मनात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिका विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी पुरोहितांच्या साक्षीने पूजाविधी करून बुधवारी पदाची सूत्रे स्वीकारली. त्यामुळे चर्चेचा विषय ठरला. पुरोगामी म्हणवणारा महाराष्ट्र आणि पुरोगामी विचारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष. त्यांच्याच पदाधिकाऱ्याने असे कृत्य करणे अनेकांना खटले. वास्तविकतः कोणत्या देवतेची पूजा करावी, हा ज्याचा-त्याचा श्रद्धेचा विषय आहे. पण, त्यात अंधश्रद्धा येऊ नये, अशी अपेक्षा केली जाते. 

चिंचवडमधील रस्त्यांवरून शिवसेना अन् भाजपमध्ये राजकारण पेटलंय

मांसाहारावर चर्चा 
वास्तविकतः बहुतांश दैवतांबाबत मांसाहार वर्ज्य असतो. परंतु, अनेकदा पदाधिकाऱ्यांच्या दालनात मांसाहाराच्या पार्ट्यांवर चर्चा ऐकायला मिळते. काही जण तर, पदाधिकाऱ्याच्या अँटिचेंबरमध्येच मांसाहार झोडताना दिसतात. मग, दैवत पूजन, श्रद्धा, भक्तीचा देखावा कशासाठी असा प्रश्‍न पडतो. 

दोष झाकण्यासाठी... 
विकासकामे मंजुरीवरून अनेकदा पदाधिकाऱ्यांमध्ये टक्केवारीची चर्चा होते. काही तर, "टक्का घ्यावाच लागतो,' असे बिनधास्तपणे सांगतात. यातून वादही होतात. त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे, काही महिन्यांपूर्वी एका पदाधिकाऱ्याने दुसऱ्याला केलेली मारहाण. असे "टक्केवारी'चे "उद्योग' झाकण्यासाठी तर दैवतांचा आधार घेतला जात नाही ना? अशी शंका येते. 

श्रद्धेला आवर कशी घालणार? 
महापालिका भवनातील पूजा विधीबाबत एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, "पूजा-विधी हा प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे. त्यांची देवावर श्रद्धा आहे म्हणून पूजा घातली. श्रद्धेला आवर कशी घालणार?' पदाधिकाऱ्याचे म्हणणे बरोबर असले तरी, सरकारी कार्यालयाच्या कक्षेत श्रद्धेचे प्रदर्शन कशासाठी? असा प्रश्‍न उपस्थित होतो. 

राजकीय नेत्यांची छायाचित्रे 
ज्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी, त्या पक्षाच्या नेत्यांची छायाचित्रे प्रत्येक दालनात आहेत. ते बघूनच संबंधित पदाधिकारी कोणत्या पक्षाचा आहे, हे लक्षात येते. हे फक्त सत्ता असेपर्यंत. निवडणूक झाली की सत्ता बदल होतो. सत्ताधारी विरोधात अन्‌ विरोधक सत्तेत येऊ शकतात. अशा वेळी त्या-त्या दालनांतील पक्ष नेतृत्वाचे छायाचित्रही बदलतात, प्रसंगी दैवतेही... 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: idols and images in office of pimpri chinchwad municipal corporation building