आखाड साजरा करण्याच्या तयारीत असाल, तर ही बातमी आधी वाचा...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

आषाढातील रिमझिम पावसाच्या धारा आणि त्यात घरच्या चुलीवरील गरमा-गरम मटण, चिकन आणि मासळीच्या भोजनावर ताव मारणे म्हणजे मांसाहारी खाद्यशौकीनांसाठी मोठी पर्वणीच.

पिंपरी : आषाढातील रिमझिम पावसाच्या धारा आणि त्यात घरच्या चुलीवरील गरमा-गरम मटण, चिकन आणि मासळीच्या भोजनावर ताव मारणे म्हणजे मांसाहारी खाद्यशौकीनांसाठी मोठी पर्वणीच. सध्या पाऊस गायब आहे. मात्र, घरोघरी आखाडाचा मौसम चालू आहे. मात्र, मटण, मासळीचे कमालीचे भाव वाढल्याने खवय्यांना त्यांचा खिसा हलका करावा लागत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

दरवर्षी साधारणतः श्रावण महिन्यापासून सणा-सुदीचे दिवस सुरू होतात. श्रावणात व्रत-वैकल्ये, पूजा-अर्चा केल्या जातात. देवाचे नामस्मरण करत भक्तीभावाने उपवास केले जातात. पवित्र श्रावण महिन्यात मांसाहार करता येत नसल्याने खवय्यांकडून आखाड साजरा केला जातो. सध्या प्रतिबंधित क्षेत्रे वगळता इतर भागांतील बंधने हटविण्यात आली आहेत. त्यामुळे खवय्यांकडूनही मटण, मासळीला मागणी वाढली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जुनी सांगवी येथील मटण विक्रेते विठ्ठल भिवाप्रवाळे म्हणाले, "स्थानिक पातळीवर चाकण, यवत, तळेगाव येथे तर संगमनेर, नाशिक येथे मोठ्या प्रमाणावर शेळ्या-मेंढ्यांचा बाजार भरत असतो. मात्र, हे बाजार सध्या बंद आहेत. पुणे जिल्ह्याबाहेर जनावरे खरेदी करता येत नाहीत. तालुक्‍यातही वाहतुकीत अडचणी येत आहेत. त्यामुळे धनगर समाजाकडूनच मिळेल त्या किंमतीत जनावरे खरेदी केली जात आहे. लॉकडाउनपूर्वी मटणाचे भाव 600 रुपये प्रतिकिलो होते. मात्र, आता विक्रेता ज्या भावाने जनावरे खरेदी करतो. तसे प्रतिकिलोचे विक्रीचे भाव कमी-जास्त होत आहेत. सध्या 650 ते 800 रुपये प्रतिकिलोने मटण विक्री होत आहे. मटणाचे भाव वाढले असले, तरी आखाडामुळे चांगली मागणी आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चिकन विक्रेते संतोष गजभीव म्हणाले, "चिकनला अजून व्यवस्थित मागणी नाही. पूर्वीच्या तुलनेत आता चिकनचे भाव उतरले आहेत. यापूर्वी चिकन 240 ते 260 रुपये प्रतिकिलो इतके होते. मात्र, आता 180 ते 200 रुपये प्रतिकिलोने विक्री केली जात आहे. काही ठिकाणी 200 ते 220 रुपये प्रतिकिलो असेही विक्रीचे भाव आहेत. गावरान कोंबडी 360 रुपयांना ग्राहकांना दिली जात आहे. कोंबड्यांची आवकही व्यवस्थित चालू आहे. येत्या दिवसांत चिकनला मागणी वाढेल.'' 

हेही वाचा- नगरसेवक दत्ता साने यांच्यासारखा झुंजार सहकारी गमावला : अजित पवारांची श्रद्धांजली

मासळी विक्रेत्या कविता आबनावे म्हणाल्या, "सुमारे 40 प्रकारच्या नदी आणि समुद्राच्या मासळीची चांगली आवक होत आहे. मात्र, मागील महिन्यांच्या तुलनेत त्यांचे भाव वाढले आहेत. पापलेट प्रतिकिलो 1 हजार ते 1200 रुपये, सुरमई 800 ते 1200 रुपये, बांगडा 360 रुपये, रहु 200 रुपये, काळी वाम 600 रुपये तर पिवळी वाम 1 हजार रुपये प्रतिकिलोने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये मालाच्या आवकीवर परिणाम झाला. दुकानांच्या वेळांमुळे विक्रेत्यांचे नुकसान होत आहे. श्रावण महिना संपेपर्यंत मासळीचे भाव आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increasing prices of meat and fish at pimpri chinchwad