पिंपरी : इंद्रायणीचं हे दृश्य बघितलंय का तुम्ही? बघा, हे केवळ लॉकडाउनमुळे झालं...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

इंद्रायणी नदी काठावर असलेले अनेक कारखाने सध्या लॉकडाउनमुळे बंद आहेत.

मोशी : इंद्रायणी नदी काठावर असलेले अनेक कारखाने सध्या लॉकडाउनमुळे बंद आहेत. त्यामधून निघणारे विषारी रसायनयुक्त पाणी सध्या इंद्रायणीच्या पाण्यामध्ये मिसळत नसल्याने सध्या इंद्रायणीचे पात्र अतिशय स्वच्छ व सुंदर दिसत आहे. त्यामुळेच कदाचित महापालिकेमध्ये मोशी, चिखली, तळवडे गावचा समावेश झाल्यानंतर प्रथमच इंद्रायणी एवढी स्वच्छ व सुंदर होऊन मोकळा श्वास घेत असल्याचे दिसून येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या 24 मार्चपासून देशामध्ये लॉकडाउन सुरू आहे. या लॉकडाउनच्या काळात मोशी, चिखली, तळवडे या पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून वाहणारी इंद्रायणी नदीपात्र परिसरामध्ये असलेले अनेक कारखानेही सध्या बंद आहेत. इतर वेळी याच कारखान्यांमधून निघणारे रसायनयुक्त घाणेरडे पाणी या इंद्रायणीच्या पात्रामध्ये सोडले जाते. मात्र, लॉकडाउनच्या काळामध्ये पात्रांमध्ये कोणत्याही प्रकारे घाण दिसून येत नाही. इतर वेळी मात्र, हिवाळ्याला सुरुवात झाली की, याच तळवडे ते चर्‍होली या परिसरादरम्यानच्या इंद्रायणी पात्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर जलपर्णी आपले प्रचंड मोठे स्वरूप धारण करते आणि संपूर्ण इंद्रायणी पात्रावर एक प्रकारे हिरवा शालू पांघरलेला दिसतो.  

याच जलपर्णीची मोठ्या प्रमाणावर वाढ होण्यासाठी हिवाळ्यातील थंडीचे वातावरण पोषक असतेच शिवाय यामध्येच हे रसायनयुक्त पाणीही मिसळल्यामुळे अधिक जोमाने ही जलपर्णी वाढली जाते. मग ही जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून लाखो रुपयांची टेंडर भरली जातात आणि त्या माध्यमातून ही जलपर्णी काढण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, ती काढता काढता पावसाळा येतो आणि ही जलपर्णी इंद्रायणीला आलेल्या पुराबरोबर पुढे वाहून जाते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यानच्या काळात शहरातील पर्यावरणप्रेमी असलेल्या विविध संस्थांनी इंद्रायणीचे पात्र स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले. सध्या मात्र या पात्रामध्ये कोणत्याही प्रकारे घाणेरडे पाणी मिसळत नसल्याने तळवडे ते चर्‍होली दरम्यान महापालिका क्षेत्रातून वाहत असलेली इंद्रायणी काही ठिकाणी झालेली थोडीशी जलपर्णीची वाढ वगळता अतिशय स्वच्छ, नितळ व सुंदर दिसत आहे.

मोशीतील इंद्रायणी घाटावर तर हे पाणी अतिशय निर्मळ, नितळ व सुंदर दिसत असल्याने मोशीतील घाटाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. त्यातच महापालिकेच्यावतीने  मोशीतील घाटाचे नुकतेच अतिशय सुंदर असे नूतनीकरण केल्यामुळे व या ठिकाणी भरपूर दाट झाडी असल्याने हा इंद्रायणी परिसर अतिशय निसर्गरम्य झाला आहे. त्यामुळेच कदाचित याठिकाणी सध्या काही लोक विश्रांतीसाठी ही बसत असल्याचे दिसत आहे.  त्यामुळेच असे नक्की म्हणता येईल की इंद्रायणी माता अतिशय स्वच्छ, नितळ व सुंदर दिसत असून मोकळा श्वास घेत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indrayani river is flowing clean in lockdown at moshi pimpri chinchwad