Video : इंद्रायणीनगरातील भाजी मंडई सुरू न झाल्याने विक्रेत्यांवर ही वेळ...

संजय बेंडे
सोमवार, 29 जून 2020

येथील इंद्रायणीनगरातील भाजी मंडईचे काम पूर्ण होऊन तीन वर्षे उलटली, तरी महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे अद्यापही भाजी मंडई सुरू न झाल्याने भाजी विक्रेत्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

भोसरी : येथील इंद्रायणीनगरातील भाजी मंडईचे काम पूर्ण होऊन तीन वर्षे उलटली, तरी महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे अद्यापही भाजी मंडई सुरू न झाल्याने भाजी विक्रेत्यांमधून संताप व्यक्त होत आहे. भाजी मंडईतील गाळे मिळविण्यासाठी महापालिकेने सांगितलेली सर्व प्रक्रिया पूर्ण करुनही गाळे न मिळल्यामुळे भाजी-फळे विक्रेत्यांना रस्त्यावर, पदपथावर भाजी-फळे विक्री करण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाद्वारे त्यांच्यावर वेळोवेळी कारवाईही केली जाते. त्यामुळे इंद्रायणीनगरातील भाजी-फळे विक्रेते दुहेरी अडचणीत सापडले आहेत. या भाजी मंडईतील गाळे तातडीने देण्याची मागणी भाजी-फळे विक्रेत्यांमधून होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

 हेही वाचा-  Breaking : भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना कोरोना

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून महापालिकेने पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व भाजी मंडई बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच, भाजी विक्रेत्यांना भाजी विक्रीसाठी सुरक्षित ठिकाणी सोय केली होती. तात्पुरत्या उभारलेल्या या भाजी मंडई बंद करून भाजी विक्रेत्यांना पुन्हा भाजी मंडईत विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र, इंद्रायणीनगरात भाजी मंडई असतानाही येथील विक्रेत्यांना रस्त्यावर बसून भाजी विक्री करावी लागत आहे.  

हेही वाचा- पिंपरी-चिंचवड : आज दुपारपर्यंत १५७ नवे पॉझिटिव्ह, तर बरे झालेले रुग्ण म्हणतायेत

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाद्वारे तीन वर्षांपूर्वी इंद्रायणीनगरातील भाजी मंडईचे काम पूर्ण करण्यात आले. दोन वर्षांपूर्वी या भाजी मंडईचे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे प्राधिकरणाद्वारे हस्तांतर करण्यात आली. मात्र, तेव्हापासून या ना-त्या कारणाने या भाजी मंडईतील गाळ्यांचे वितरण करणे रखडले आहे. त्यामुळे ही भाजी मंडई सध्या बंद स्थितीतच आहे. त्याचप्रमाणे भाजी मंडई बंद असल्याने या ठिकाणी तळीराम, गर्दूल्यांचा वावर वाढला आहे. तसेच, चोरट्यांनी येथील गटारावरील काही बंदिस्थ लोखंडी जाळ्याही लंपास केल्या आहेत. त्यामुळे या भाजी मंडईला अवकळा आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाजी मंडईतील गाळे वाटप तातडीने झाले नाही, तर भाजी मंडईचा ताबा इंद्रायणीनगरातील स्थानिक भाजी विक्रेत्यांद्वारे घेण्याचा इशारा इंद्रायणीनगर भाजी-फळे विक्रेता संघाच्या अध्यक्षा मेरी डिसोझा यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे भाजी मंडईतील गाळे मिळेपर्यंत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाद्वारे कोणतीही कारवाई न करण्याची मागणीही डिसोझा यांनी केली आहे.    
 

स्थायी समितीच्या फेब्रुवारीत झालेल्या सभेत भोसरीतील इंद्रायणीनगरातील गाळे भाजी विक्रेत्यांना देण्यासाठीची मंजूरी देण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या संचारबंदीमुळे भाजी विक्रेत्यांशी करारनामा आणि प्रत्यक्ष ताबा, ही प्रक्रिया तीन महिन्यांपासून रखडली आहे. ही प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्यासाठी महापालिकेत पाठपुरावा करत आहे.
 
- विलास मडिगेरी, माजी अध्यक्ष, स्थायी समिती

गेल्या तीन वर्षापासून ही भाजी मंडई सुरू करणेबाबत आयुक्ताकडे पाठपुरावा करत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेद्वारे लॅाकडाउनच्या काळामध्ये भाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे गरजेचे होते. नाईलाजास्तव भाजी-फळे विक्रेत्यांना रस्ते-पदपथावर बसून भाजी विक्री करण्याची वेळ आली आहे.  महापालिकेच्या अतिक्रमण विभागाद्वारे त्यांच्यावर कारवाईही केली जाते. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून इंद्रायणीनरातील भाजी मंडईतील गाळे तातडीने स्थानिक भाजी विक्रेत्यांना देणे गरजेचे आहे.

- संजय वाबळे, स्वीकृत सदस्य

दृष्टीक्षेपात भाजीमंडई

  • भाजी ओटे- ७२
  • फ्रूट स्टॅाल- १८
  • भाजी मंडई शेड क्षेत्र- १६३७.६४ चौरस मीटर
  • स्वच्छतागृह क्षेत्र- ६५.०४ चौरस मीटर
  • पार्किंग क्षेत्र- ६५८.३५ चौरस मीटर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indrayaninagar vegetable market has not started