उद्योगनगरीतील कंपन्या सुरू होणार; त्यासाठी...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 May 2020

- लॉकडाउनमुळे दीड महिन्यांपासून उद्योगनगरीतील कंपन्या बंद आहेत. त्यामुळे उद्योजक हवालदिल झाले आहेत.

पिंपरी : लॉकडाउनमुळे दीड महिन्यांपासून उद्योगनगरीतील कंपन्या बंद आहेत. त्यामुळे उद्योजक हवालदिल झाले आहेत. शहरातील कंटेन्मेंट झोन वगळून अन्य भागातील उद्योग सुरू करण्यासंदर्भात स्वतंत्र नियामवली तयार करून त्याचा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारच्या उद्योग विभागाकडे पाठविला आहे. त्यांच्याकडून अंतिम मान्यता मिळाल्यानंतरच येथील उद्योग सुरू करण्याचा मार्ग खूला होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शहरातील उद्योजकांनी शनिवारी (ता. 9) महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन उद्योग सुरू करण्याच्या विषयावर सविस्तर चर्चा केली. त्यावेळी झालेल्या चर्चेमध्ये हे मुद्‌दे समोर आले. या बैठकीला पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उद्योजक विनोद जैन, आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. 8) पुण्यात बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी पिंपरी-चिंचवडमध्ये कंटेन्मेंट झोन सोडून अन्य भागातील उद्योग कसे सुरू करता येतील. यासंदर्भात चर्चा झाली. हा भाग सोडून अन्य भागातील कंपन्या सुरू करताना त्याठिकाणी कंटेन्मेंट झोन आणि पुण्यातील कर्मचाऱ्यांना येथे कामासाठी आणता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, कंपन्या सुरू करण्यासाठी आवश्‍यक असणारी परवानगी महापालिकेकडून देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक असणारे पोर्टल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महापालिकेने तयार केलेली नियमावली ही अंतिम मान्यतेसाठी उद्योग विभागाकडे पाठवली आहे. त्यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. उद्योग सुरू करण्यासाठी उद्योजकांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. मात्र, त्यासाठी उद्योग विभागाकडून हिरवा कंदील मिळण्याची वाट पाहावी लागणार असल्याचे बेलसरे यांनी सांगितले. 

उपमुख्यमंत्र्यांचे प्रयत्न कामी... 
उद्योगनगरीतील उद्योग सुरू करावेत, यासाठी शहरातील अनेक उद्योजकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विनंती केली होती. त्यानंतर त्यांनी यामध्ये लक्ष घालून यावर तत्काळ कसा मार्ग काढता येईल. यासाठी हालचाली सुरू केल्या. त्यामुळे हे सकारात्मक चित्र दिसत आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: industry will start after approval by the industry department of state government