Pimpri : पालिका आयुक्तांकडून महापौरांचा अवमान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri chinchwad
पालिका आयुक्तांकडून महापौरांचा अवमान

पालिका आयुक्तांकडून महापौरांचा अवमान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोना काळात रुग्ण नसताना स्पर्श हॉस्पिटलला तीन कोटींपेक्षा अधिक रक्कम दिली. यात मोठा गैरव्यवहार झाला आहे. त्याची चौकशी करून अहवाल सर्वसाधारण सभेत सादर करण्याचा आदेश चार महिन्यांपूर्वी महापौर उषा ढोरे यांनी दिला होता. मात्र, आयुक्तांनी अद्याप अहवाल दिलेला नाही. तसेच, आयटीआयमध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन झाले नाही, विविध विषयांची माहिती सदस्यांना दिली जात नसल्याने महापौरांचा व सभागृहाचा महापालिका आयुक्त अवमान करीत आहेत, असा आरोप सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांसह विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना सदस्यांनीही गुरुवारी (ता. १८) सर्वसाधारण सभेत केला.

नोव्हेंबर महिन्याची सर्वसाधारण सभा सोमवारी (ता. १५) तहकूब केली होती. ती गुरुवारी घेण्यात आली. महापौर उषा ढोरे पीठासन अधिकारी होत्या. श्वान, मांजर अशा पाळीव प्राण्यांना सार्वजनिक ठिकाणी शौचास नेणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा व पशुंवरील उपचारासाठी शुल्क आकारण्याचा प्रस्ताव होता. त्यावर चर्चा झाली. त्या दरम्यान, सदस्यांनी आयुक्तांना धारेवर धरले. त्यात माउली थोरात, योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, मंगला कदम, अजित गव्हाणे, सीमा सावळे, संदीप वाघेरे, मीनल यादव, आशा शेंडगे यांचा समावेश होता. या विषयावरील चर्चेत हर्षल ढोरे, विकास डोळस, सारिका बोऱ्हाडे, अंबादास कांबळे, नामदेव ढाके यांनीही सहभाग घेतला. श्वान व अन्य प्राण्यांना बंदिस्त करणे गुन्हा ठरतो. त्यामुळे त्यांची केवळ नसबंदी शस्रक्रियाच आपण करू शकतो, असे महापौरांनी स्पष्ट केले.

उपसुचनेवरून वाद-विवाद

श्वानांबाबतच्या विषयाला ‘करात पाच टक्के सवलत’ देण्याबाबतची उपसूचना देण्यात आली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, मंगला कदम यांनी ‘उपसूचना संयुक्तिक नाही,’ असा आक्षेप घेतला. तर, पक्षनेते नामदेव ढाके यांनी उपसूचना संयुक्तिक असल्याचे सांगून ती मंजूर करण्याची विनंती केली. त्यानंतर उपसूचनेसह महापौरांनी विषय मंजूर केला. त्यानंतर, एकच सदस्य अनेक उपसूचना मांडत असल्याचा आक्षेप बहल यांनी घेतला. त्यावरही ढाके यांनी, एक सदस्य एकच उपसूचना मांडत असून त्यात विषय वेगवेगळे आहेत, असे सांगून विषय मंजूर करण्याची विनंती केली.

दापोडी एसआरए रद्द

यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाईचा आठ क्रमांकाचा विषय वाचला जात असताना राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू बनसोडे यांनी तीन क्रमांकाच्या विषयाला उपसूचना मांडत बोलणे सुरू केले. त्यावर ढोरे यांनी शांत राहण्याचे आवाहन केले. पण, बनसोडे बोलतच राहिल्याने गोंधळ झाला. त्यात पुढील दोन विषय वाचून झाले. ते तहकूब केल्याचे सांगून ढोरे यांनी बनसोडे यांना बोलण्याची संधी दिली. दापोडीतील एसआरए प्रकल्प रद्द केल्याबद्दल महापौर, पक्षनेते व भाजपचे आभार माणतो असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाला नागरिकांचा विरोध असल्याने तो रद्द करण्याचा योग्य निर्णय घेतल्याचे आशा शेंडगे यांनी मत व्यक्त केले.

महापौरांचे आदेश...

  1. पुढील सभेपासून सर्व अधिकारी सभागृहात उपस्थित राहतील

  2. श्‍वान निर्बीजीकरण शस्रक्रियेची चौकशी करावी

  3. जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या संस्थेकडून माहिती घ्यावी

  4. शहरातील खड्ड्यांची पाहणी करून अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी

  5. जखमी बेवारस जनावरांवर वेळेवर उपचार करावेत

  6. कामचुकार व उद्धट वर्तन असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

loading image
go to top