esakal | पिंपरी : क्रिकेट बेटिंग प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

पिंपरी : क्रिकेट बेटिंग प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - गहूंजे स्टेडियमवरील क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन बेटिंग प्रकरणात पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने बेटिंगमधील कुख्यात आरोपी कमल खान याला नागपूर येथून अटक केली आहे. कमल खान याच्यासह इतर निष्पन्न झालेल्या नावावरून या बेटिंग प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचे समोर येत आहे.

गहुंजे येथे २६ मार्चला भारत-इंग्लंड क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन बेटिंग घेणाऱ्या टोळीला मामुर्डी, घोरावडेश्वर डोंगर तसेच विमाननगर या तीन ठिकाणाहून पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपींचे नेटवर्क आंतरराष्ट्रीय पातळीवरील बुकींशी असण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला. अटकेत असलेल्या आरोपींकडे केलेल्या तपासात ते वापरत असलेल्या बारा बेटिंग ऍपची नावे तसेच बेटिंग ऍपचे मालक, त्याचे आयडी व पासवर्ड विकणाऱ्या एकूण ३२ आरोपींची नावे निष्पन्न झाली. त्यानुसार अटक आरोपींना बेटिंग करिता युजर आयडी, पासवर्ड विक्री करणाऱ्या मुंबईतील तीन, नागपूर येथील पाच, उल्हासनगर येथील चार बुकींना अटक केली असून यामध्ये कमाल खानचाही समावेश आहे.

हेही वाचा: पिंपरी : रेमडेसीव्हीर इंजेक्शन काळ्या बाजाराने विकणारे दोघे अटकेत

या प्रकरणात तपास गुन्हे शाखा युनिट चारच्या या पथकाने सोमवारी (ता. २६) नागपूर येथून कमल खान याला अटक केली. कमल खान हा बेटिंगमधील कुख्यात आरोपी असून त्याचे भारतभर जाळे आहे. यासह पिंपरीतील दिनेश बदलानी यालाही पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणात भारताच्या विविध राज्यातील अनेक मोठमोठ्या बुकींची नावे निष्पन्न झाली आहेत. तसेच कॅरिबियन बेटांमधील सेंट लुसिया या देशातील एका आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावरील जॉन नामक स्टाफ अटक आरोपींपैकी एकाच्या संपर्कात असल्याचे व त्याने या बुकींना क्रिकेट सामन्याचे मैदानावरील फोटो पाठवल्याचे आढळून आले आहे. यासह यापूर्वी अटक असलेल्या ३३ आरोपींपैकी मूळ गोवा येथील असलेला व सध्या पोर्तुगाल येथील राष्ट्रीयत्व मिळवलेला एक आरोपी असून तो चालू क्रिकेट सामन्याची लाईव्ह माहिती मोबाईलद्वारे इंग्लड येथील एका क्रमांकावर देत असल्याचेही आढळून आले आहे. यावरून हे प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचल्याचे समोर येते. या बुकींच्या संपर्कात कोणी क्रिकेटपटू आहे का, त्यानं एखाद्या क्रिकेटपटू मार्फत मॅच फिक्सिंगसारखा प्रकार केला आहे का, याचाही तपास सुरु आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) पत्रव्यव्हार करणार असल्याचेही पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

loading image