
माझी बदली नियमाला धरून नाही : कृष्ण प्रकाश
पिंपरी : ‘‘ज्याठिकाणी साडेतीन वर्षे काम करून आलो त्याच ठिकाणी पुन्हा बदली केली, तीही कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच. माझी ही बदली नियमाला धरून नाही,’’ अशी प्रतिक्रिया नुकतेच बदलून गेलेले माजी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली आहे. या बदलीबाबत ते नाराज असून, कारण जाणून घेण्यासाठी ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस महासंचालक यांना भेटणार असल्याचेही बोलले जात आहे.
कृष्ण प्रकाश यांनी सप्टेंबर २०२० ला पिंपरी-चिंचवड आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली होती. विविध कारवाई, स्टिंग ऑपरेशन, वेषांतर, कार्यक्रमांना उपस्थिती यामुळे ते नेहमीच चर्चेत असायचे. मात्र, त्यांची १९ महिन्यातच विशेष महानिरीक्षक मुंबई येथे बदली करण्यात आली. एका स्पर्धेसाठी ते परदेशात गेलेले असतानाच त्यांच्या बदलीचा आदेश आला. नूतन आयुक्त अंकुश शिंदे यांना कृष्ण प्रकाश परदेशातून परतण्याची वाट न पाहता अतिरिक्त पोलिस आयुक्तांकडून चोवीस तासांच्या आतच पदभार स्वीकारला. मात्र, अशाप्रकारे झालेल्या बदलीमुळे कृष्ण प्रकाश नाराज असल्याचे बोलले जाते. कृष्ण प्रकाश म्हणाले, ‘‘बदलीचे काहीच कारण माहीत नाही, परदेशात असताना बदलीचे समजले. माझ्या सोबतच्या इतर अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या नसताना केवळ माझीच मुदतपूर्व बदली करण्यात आली.
तसेच जेथे साडेतीन वर्षे काम केले आहे त्याच ठिकाणी पुन्हा पाठविले आहे. त्याठिकाणी पोलिस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी सहा सात महिन्यापेक्षाही अधिक काम करीत नाहीत, तेथे आपण पूर्ण साडेतीन वर्षे काम केले आहे. त्याच ठिकाणी पुन्हा बदली करून काय मेसेज द्यायचा हे मलाही समजलेले नाही. ही बदली नियमाला धरून नाही.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महासंचालकांना भेटणार
नियमानुसार न झालेल्या बदलीमुळे ते नाराज असल्याचे स्पष्ट आहे. त्यांनी शनिवारी बारामती येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांची भेट घेतली. तसेच बदलीचे कारण जाणून घेण्यासाठी ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पोलिस महासंचालक यांनाही भेटणार असल्याचे बोलले जात आहे.
बारामतीत घेतली शरद पवार यांची भेट
बारामती नुकत्याच झालेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडचे मावळते पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी (ता. २३) ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. सकाळीच कृष्ण प्रकाश गोविंदबाग येथे आले. त्यांनी पवार यांच्याशी दहा ते बारा मिनिटे संवाद साधला आणि तेथून ते निघून गेले. नेमकी काय चर्चा झाली याची माहिती त्यांनी देण्यास नकार दिला. ही खासगी भेट होती इतकेच त्यांनी सांगितले. नुकत्याच राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, त्यात कृष्ण प्रकाश यांची पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त पदावरून मुंबईला व्हीआयपी सुरक्षा विभागात बदली झाली आहे. या बदलीवरून कृष्ण प्रकाश नाराज असल्याचे समजते. कृष्ण प्रकाश यांना थांगपत्ता न लागू देता बदली केली गेल्याचीही जोरदार चर्चा आहे. कारण बदली झाली तेव्हा ते परदेशात होते, असे बोलले जात आहे.
Web Title: Ips Krishna Prakash Meet Sharad Pawar Police Officer Transfer Issue Pimpri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..