हार मानतील ते आयटीयन्स कसले; पाहा ते आता काय करतायेत

सुवर्णा नवले
Sunday, 13 September 2020

  • स्टार्टअपसह नवीन टेक्‍नॉलॉजीवर अभियंत्यांचे काम सुरू 

पिंपरी : अचानकच काही कंपन्यांनी मेल आणि मेसेजद्वारे टर्मिनेट करणार असल्याचं सांगितलं. माझ्याबरोबर अनेक मित्रांची झोप उडाली. बोलण्याची संधीही कंपनीनं दिली नाही. शहरातच नव्हे, तर राज्यभरात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे आम्ही बॅकफूटवर आलो. इतक्‍या वर्षाच्या मेहनतीवर क्षणांत पाणी फिरलं. मात्र, लॉकडाउनपासून नवीन काही तरी करायचं ठरवलं. पत्नी आयटीमध्ये नोकरी शोधत होती. तिलाही नोकरी मिळाली नाही. शेवटी बेकरी व्यवसायाला प्राधान्य दिलं. पत्नी निरालीला बेकरी पदार्थ शिकण्यामध्ये रस होता. याच व्यवसायात गुंतवणूक केली. अन्‌ चार महिन्यांत चांगला जम बसला. आता काही दिवसांनी नोकरी जाण्याचीही भीती मनात उरली नसल्याचे आयटी अभियंता रितेशने सांगितलं. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात शंभरहून अधिक बड्या आयटी कंपन्या कार्यरत आहेत, तर साडेतीन लाख आयटीयन्स यामध्ये काम करीत आहेत. मार्चनंतर बऱ्याच जणांना थेट मेल आणि मेसेजवरून नोकरीचं टर्मिनेशन हातात मिळालं. बऱ्याच जणांनी कामगार कायद्याचा वापरही केला. कंपन्यांनी कामावर पुन्हा घेण्याचं आश्‍वासन दिलं. मात्र, अद्यापही परिस्थिती 'जैसे थे'च आहे. कंपन्यांना नवीन प्रोजेक्‍ट न मिळाल्यानं मोठ्या पॅकेजपासून ते मध्यम पॅकेजपर्यंतच्या सर्वांना कामावरून घरी बसवलं. काही अन्यायाविरोधात लढा देत आहेत. काहींनी इतर व्यवसायांमध्ये संधीचं सोनं करण्याचं ठरवलं आहे. आयटी अभियंता बसू म्हणाला, "वेबसाइट डेव्हलप करणार आहे. न्यूज पोर्टलवर सध्या काम करीत आहे. ज्या मित्रांच्या नोकऱ्या गेल्या, त्यांना माझ्या पोर्टलवरून काम देण्याचा प्रयत्न करीत आहे.'' 

काय केलं नवीन? 
सध्या खराडी, हडपसर, तळवडे, मगरपट्टा, हिंजवडी या भागात काम करणाऱ्या आयटीयन्सनं जोडधंदा सुरू केला आहे. यामध्ये बऱ्याच जणांनी फूड व्यवसाय जसे बेकरी, घरपोच खाद्यपदार्थांची डिलिव्हरी सुरू केली आहे. त्याचबरोबर नवीन टेक्‍नॉलॉजी अवगत करण्यास सुरुवात केली आहे. सरकारच्या 'चुनौती' ऍपवर काम सुरू केलं आहे. सोशल मीडिया सर्व्हिस, क्‍लाऊड सर्व्हिस, विविध वेब पेजेस तयार करून देणं, तसेच नवनवीन ऍपवर काम सुरू केलं आहे. दहा ते 20 वर्षांचा अनुभव आता टेक्‍नॉलॉजीसह स्टार्टअपसाठी वापरण्याचं बऱ्याच जणांनी ठरवलं आहे. 

कॅबचा पर्याय स्वीकारला 
विजयने सांगितलं, की सध्या खराडीत आयटी कंपनीत काम करीत आहे. पण याबरोबरच माझी कार मी भाडेतत्त्वावर कॅबसाठी दिली आहे. नोकरीचा भरवसा नाही. नातेवाईक व घरातील सदस्यांच्या चार कार सध्या माझ्याकडे आहेत. कॅबची सोशल मीडियावर जाहिरात केली. चार चालक नेमले. त्यांचा पगार जाऊन चांगले पैसे मिळतात. थोडी मेहनत घेतली. थोडी सतर्कता गरजेची आहे. अन्यथा ग्राहक दुसरीकडे वळतो. 

काय स्थिती? 

  • आयटीयन्सच्या तक्रारी : 72 हजारांहून अधिक 
  • पगार कपात : 50 हजारांहून अधिक 
  • नोकरीवरून काढलेले : 22 हजारांवर 
  • नवीन व्यवसायात पाऊल : 300 हून अधिक 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: it employees started own business in pimpri chinchwad pune