Pimpri : महापुरुषांचे विचार आत्मसात करणे गरजेचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sambhajiraje Chhatrapati

महापुरुषांचे विचार आत्मसात करणे गरजेचे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ‘‘महापुरुषांचे पुतळे उभारणे गैर नाही. पण, त्यांचे विचारही आत्मसात करणे गरजेचे आहे,’’ असे मत खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. महापालिकेतर्फे पिंपरीत महात्मा फुले व केएसबी चौकालगत राजर्षी शाहू महाराज सृष्टीच्या कामाचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, नगरसेवक तुषार हिंगे, केशव घोळवे, नगरसेविका अनुराधा गोरखे आदी उपस्थित होते.

संभाजीराजे म्हणाले, ‘‘महात्मा ज्योतिबा फुले व राजश्री शाहू महाराज यांनी आयुष्यभर समाजासाठी काम केले. समाजाला दिशा दिली. पुरोगामी समाज घडवला. नवीन पिढी घडवण्यासाठी त्यांच्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांसह शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार पोहोचणे काळाची गरज आहे. त्यासाठी महापुरुषांच्या जीवनावर आधारित सृष्टी उभारून पिंपरी-चिंचवड महापालिकेने विचारांची श्रीमंती दाखवली आहे.’’

क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी उभ्या केलेल्या पुरोगामी चळवळीला फुले सृष्टी आणि शाहू सृष्टीच्या माध्यमातून मांडण्याचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा उपक्रम स्तुत्य असून येणा-या पिढ्यांना सतत मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारा ठरेल असे सांगून संभाजीराजे म्हणाले, ‘‘महापुरुषांनी आयुष्यभर समाजकार्य करून समाजाला दिशा दिली. फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांनी पुरोगामित्वाचा पाया रचला आहे. त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहचवणे काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने फुले सृष्टी आणि शाहू सृष्टीच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महापालिका करीत असलेले काम कौतुकास्पद आहे.’’ किरण गायकवाड यांनी सुत्रसंचालन केले.

शाहू सृष्टी

  1. सुमारे सात कोटी २८ लाख रुपये खर्च अपेक्षित

  2. शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित म्युरल्स असणार

  3. कुस्ती आखाडा, हत्तींची लढाई, गाव, शाळा व तलावाचे म्युरल्स

फुले सृष्टी

  1. सुमारे १६ कोटी ५७ लाख रुपये खर्च अपेक्षित

  2. ज्ञानजोती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार

  3. फुले यांच्या जीवनावर आधारित प्रेरणायक म्युरल बसविणार

loading image
go to top