Video : कल्हई करणाऱ्या कारागिरांना गणेशोत्सवामुळे 'चकाकी' 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 August 2020

  • तांबे, पितळाची भांडी चमकवणाऱ्यांना गणेशोत्सवात 'अच्छे दिन'
  • व्यवसाय नामशेष होण्याचा मार्गावर 

पिंपरी : 'कल्हईवाला कल्हई, तांबे पितल के बर्तन को कल्हई करलो कल्हई, कल्हई लावा कल्हई...' ही चिरपरिचित हाक काळाच्या ओघात मागील वीस वर्षांपासून कानाला ऐकू येत नाही. घरोघरी वापरण्यात येणाऱ्या तांबे-पितळाच्या भांड्यांची जागा स्टेनलेस स्टीलने घेतली. दूरवर फिरूनही भांडे कल्हईला फारसा उत्साह नसल्याने बदलत्या काळात कल्हई करणारे कारागीरही दुर्मिळ झाल्याने हा व्यवसाय नामशेष होत आहे. मात्र, गणेशोत्सवामुळे कारागिरांच्या हाताला काम मिळाले आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांना मिळणार उद्यापासून 'जम्बो फॅसिलिटी' 

तांबे, पितळी भांड्यांना आतून कल्हई लावण्यासाठी कल्हईवाले गल्लोगल्ली फिरून आपला व्यवसाय करायचे. अंगणात कल्हई लावणारा बसायचा. तो कोळशाच्या निखाऱ्यावर भांडे गरम करून नवसागराची पूड टाकून स्वच्छ करून लगेचच कथिलची कांडी फिरवायचा. ही कांडी जादुई करामत करून तांबे, पितळाचे भांडे आतून चांदीसारखे चमकायचे. त्यामुळे कल्हईवाल्याला खूप महत्त्व होते. वीस वर्षांपूर्वी गरीब असो वा श्रीमंत, झोपडीतला असो वा बंगलेवाला सगळ्यांकडेच तांबे, पितळाची भांडी असायचीच. कल्हई करणारा आपल्या कौशल्याने गरम चटके देत लोकांना रुपेरी भांडी वापरायचा अनुभव अगदी नाममात्र पैशात देत असे. पण आता ही भांडी महाग असून, त्यांना घासण्यासाठी लागणारी मेहनत यामुळे सर्व भांडी अडगळीत पडली आहेत, तर काहींनी मोड म्हणून विक्री केली. परिणामी कल्हई कारागिरांना इतर व्यवसायाकडे वळावे लागले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कल्हईच्या दरात वाढ 

महागाईचा फटका कल्हई व्यवसायालाही बसला आहे. अगदी सहा महिन्यातून एखादे काम मिळते. शिवाय कल्हई करण्यासाठी लागणारे कथिल धातूचे दर 1200 रुपये प्रतिशंभर ग्रॅम आहेत. 50 रुपयांना नवसागरचा एकबार मिळतो. कल्हईसाठी लागणारे कोळशाचे दर वाढले असून, 80 आणि 100 रुपये प्रतिकिलो आहे. त्यामुळे कल्हईच्या दरात वाढ झाली आहे. कल्हई करण्यासाठी आता प्रत्येक भांड्यांसाठी आकाराप्रमाणे 400 ते 600 रुपयांपर्यंत घेण्यात येतात. 400 रुपये डझनावर छोटी भांड्यांना कल्हई करण्यात येते. 

तांबे, पितळाच्या भांड्यांचा वापर केवळ गौरी-गणपती, देवपूजा आणि कन्यादान करण्यापुरताच नागरिक करतात. 
- आनंदीबाई नारवे, कल्हई कारागीर 

  • तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीरातील उष्णता होते कमी 
  • पितळाच्या भांड्यात शिजवलेले अन्न बनते अधिक रुचकर 
  • तांबे, पितळाच्या भांड्यातील अन्न नासू नये, म्हणून कल्हई करतात 
  • ही भांडी घराघरांतून हद्दपार, तर मोठमोठ्या हॉटेल्समध्येच होतो वापर 
  • आता स्टील, ऍल्युमिनिअमच्या भांड्यांकडे वाढला कल 

Edited by Shivnandan Baviskar
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kalhai to copper, brass utensils on occasion ganeshotsav pimpri chinchwad news