पूर्वीची दर्पपुडीका, आताची दापोडी जपतेय शिवकालीनपूर्व मंदिर; वाचा हा इतिहास...

रमेश मोरे
Monday, 27 July 2020

पूर्वीचे शिवकालीनपूर्व दर्पपुडीका नाव असलेली सध्याची पिंपरी-चिंचवड व पुण्याचे प्रवेशद्वार असलेली आजची दापोडी अनेक ऐतिहासिक वारसा जतन करत उभी आहे.

जुनी सांगवी : श्रावणमास सुरू झाला, की उपवास, पूजा, हर हर महादेव नामाचा गजर, भजन, कीर्तन सत्संगाने हा महिना भक्तिमय असतो. मात्र, कोरोनामुळे मंदिरातील भजन, कीर्तन सप्ताहाला बंधने आली आहेत. यामुळे यंदा सर्वांचाच हिरमोड झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुणे जिल्ह्याचे मध्यवर्ती गाव म्हणून ओळख असलेले तसेच, पूर्वीचे शिवकालीनपूर्व दर्पपुडीका नाव असलेली सध्याची पिंपरी-चिंचवड व पुण्याचे प्रवेशद्वार असलेली आजची दापोडी अनेक ऐतिहासिक वारसा जतन करत उभी आहे. दापोडीत फिरंगाई देवी मंदिर, विठ्ठल मंदिर याचबरोबर शिवकालीनपूर्व  शिवमंदिर असल्याने दर्पपुडीका ऊर्फ आजची दापोडी पिंपरी-चिंचवड शहरात ऐतिहासिक वारसा जतन करून आहे.

पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात भाजप नगरसेवकाचा धिंगाणा; डॉक्टरांचे काम बंद आंदोलन

सुमारे तीन गुंठे जागेवर येथील शिवमंदिर आजही दिमाखात उभे आहे. दापोडी गावातील हे पहिले मंदिर आहे. शिवकालीनपूर्व असल्याने या मंदिराचे महात्म्य दापोडीकरांनी जतन केलेले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ शिवनेरीहून येताना दापोडी येथे विसावा घेऊन या मंदिरात दर्शनाला यायच्या. दर्शन, पूजा करून त्या पुढील प्रवास करायच्या. मंदिराचे चुना मातीतील दगडी बांधकाम असून, येथे भव्य दीपमाळ व मंदिराबाबत त्यावर कोरीव काम केलेली माहितीही होती. मात्र, कालांतराने येथील दीपमाळेची पडझड झाल्याने ती अस्तित्वात नाही. प्रवेश द्वारासमोर दगडामध्ये विविध देवतांच्या मूर्त्या आहेत. प्रवेशद्वारावर मेघडंबरीत नंदीची प्रतिष्ठापना केलेली पहायला मिळते. काळानुरूप गावकऱ्यांनी याची रंगरंगोटी करून सुशोभीकरण केलेले पहावयास मिळते. शेजारीच पुरातन पिंपळवृक्ष या मंदिराची साक्ष देत उभा आहे. चार दगडी खांबावर उभे असलेले मंदिर गाभाऱ्यात या खांबावरही देवतांची कोरीव चित्रे पहावयास मिळतात.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजची भोसरी ही पूर्वी भोजापूर नावाने ओळख होती. भोजापूर राजाच्या नावावरून भोसरी हे नाव प्रचलित झाले. भोजापूर राजा घोड्यावरून दर्पपुडीका म्हणजे आजची दापोडी येथे या शिवमंदिरात पूजा करण्यासाठी यायचे. तर जिजाऊंनी या मंदिरास ताम्रपट अर्पण केलेला आहे. पुणे जिल्ह्याचा मध्यवर्ती भाग म्हणून पूर्वीपासून या भागाची ओळख आहे. जवळच पवना, मुळा नद्यांचा संगम घनदाट अरण्य, निसर्गाची विविध विपुलतेचा ठेवा, निसर्गरम्य ठिकाणामुळे येथे तपश्चर्येसाठी साधू-संताचे आवडते ठिकाण म्हणून पंचक्रोशीत ओळख होती. तर मध्यवर्ती ठिकाण असल्याने सैन्यांचे मध्यवर्ती तळही या ठिकाणी अस्तित्वात होते, असे येथील इतिहासाचे अभ्यासक सुभाष गोपाळ बोधे सांगतात. आजही पंचक्रोशीतून श्रावण महिन्यात येथे भाविकांची मोठी गर्दी होते. मात्र, कोरोनामुळे भक्तांचा हिरमोड झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: to know history of shiv temples in dapodi pimpri chinchwad pune