गौरीपूजेला लागणारी फुले कुठून अन् कशी येतात माहितीय का? नसेल तर घ्या जाणून

दक्ष काटकर 
Monday, 24 August 2020

  • आदिवासी जोखीम पत्करून करताहेत तोडणी
  • स्थानिक बाजारपेठेत विक्री 

टाकवे बुद्रूक (ता. मावळ) : गौरीच्या प्रतिष्ठापनेसाठी लागणारी गौरीची वेगळी फुले आपण बाजारातून आणतो. पण ती फुले बाजारात कुठून आणि कशी येतात, हे अनेकांना माहीत नसते. डोंगरकपारामध्ये गौरीची ही फुले येतात. आदिवासी मंडळी ही फुले तोडणीचे जोखमीचे काम करतात. त्यातून त्यांना काही प्रमाणात पैसे मिळतात. त्यातून ते आपला सण साजरा करतात. यंदा कोरोनामुळे त्यांच्या उत्पन्नाचे सर्वच स्रोत आटल्याने आदिवासींनी गौरीच्या फुले तोडणीचा मार्ग निवडला आहे. 

'गौरी'ला यंदा सखींचा गोतावळा नाहीच!

मावळ तालुका हा निसर्गाच्या जैवविविधतेची खान आहे. येथील जंगलात वेगवेगळ्या जातीचे प्राणी, पक्षी, झाडे याबरोबरच रानफुलांचाही खजिना आढळतो. या रानफुलांमध्ये गणपतीच्या सणावेळी वापरल्या जाणाऱ्या गौरीची फुले खूप महत्त्वाची आहेत. गौरी पूजनाच्या वेळी फुलांची पूजा केली जाते. मंगळवारी (ता. 25) गौरीची स्थापना होणार असून, त्यासाठी लागणाऱ्या फुलांसाठी नागरिकांनी जंगलाकडे धाव घेतली आहे. भल्या पहाटे आदिवासी लोक डोंगरदऱ्यात अत्यंत अवघड ठिकाणी उगवणारी ही गौरीची फुले तोडण्यासाठी जातात. एक जण सरासरी दोनशे फुले आणू शकतो. या काळात फुलाला पाच रुपये भाव मिळतो. त्यातूनच आदिवासींचा गणेशोत्सव साजरा होतो. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शनिवारी गणेशाचे घरोघरी साधेपणाने आगमन झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील मंडळांनीही साधेपणाने गणरायाची स्थापना केली. सजावटीचे सामान खरेदी करण्यासाठी कामशेत, टाकवे बुद्रूक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आता महिलांना वेध लागले आहे ते गौरीचे. गौरीची स्थापना मंगळवारी होणार असून, गौरीच्या सजावटीच्या, पूजेच्या सामानाची खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी स्थानिक बाजारपेठेत होत आहे. ग्रामीण भागातील नागरिक गौरीची फुले तोडण्यासाठी जंगल गाठत आहे. 

डोंगर उतारावर गौरीची फुले तोडणे खूप अवघड काम आहे. पण यातून विक्री करून मिळणाऱ्या पैशातून गणपती सण निघतो. दरवर्षी ही फुले घेऊन तळेगाव, पिंपरी, लोणावळा येथे जात असतो. मात्र, सध्या लोकल बंद असल्याने आता टाकवे तसेच कामशेत बाजारपेठेतच मध्येच फुलांची विक्री करणार आहे. 
- अरुण गाडे, फुलविक्रेता 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: to know how get special flowers for gauri festival maval pune