esakal | व्यापारी स्पेसमध्ये आघाडी; उद्योगनगरीत भाडेतत्त्वावर भर

बोलून बातमी शोधा

Trading
व्यापारी स्पेसमध्ये आघाडी; उद्योगनगरीत भाडेतत्त्वावर भर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - स्थान अर्थात लोकेशन, बांधकामाचे प्रमाण आणि जीवनशैलीची गुणवत्ता या निकषांवर पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीने जागेत (जमीन) गुंतवणूक करण्याबाबत पुण्यातील पाच आघाडीच्या विभागांमध्ये प्रवेश केला आहे. नवीन बांधकामासाठी आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जमिनीच्या उपलब्धतेअभावी शहराच्या अनेक भागात ऑफिससाठीच्या इमारतींचे नवे बांधकाम शक्य नाही. यामुळेच पिंपरी-चिंचवड परिसरात रास्त भावात जमीन उपलब्ध असल्याने महत्त्व आले आहे, असा निष्कर्ष कॉलिअर्स संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आला आहे.

मुंबईतील म्हापे व अंधेरी एमआयडीसीत

जागेअभावी औद्योगिक इमारतींच्या अनेक केंद्रांमध्ये आयटी पार्क आणि कमर्शिअल पार्कमध्ये रूपांतर होत आहे, तसेच चित्र स्थानिक बाजारपेठेत लवकरच दिसू लागेल, असा विश्वास सर्वेक्षणात व्यक्त केला आहे. सध्या शहराच्या स्थानिक बाजारपेठेत मुख्यतः निवासी इमारतींचा विकास होत आहे. त्यांची गेल्या पाच वर्षातील सर्वसाधारण व्यवसायवृद्धी २.४३ टक्के चक्रवाढ दराने होत आहे. ही वृद्धी पुण्यातील अनेक स्थानिक बाजारपेठांच्या तुलनेत अधिक आहे. सध्या २० लाख चौरस फूट व्यापारी वापरासाठीची जागा उपलब्ध आहे. त्यातील बहुतांश जागा भाड्याने घेऊन वापरली जाते.

हेही वाचा: पिंपरी : रेमडेसीव्हीर इंजेक्शन काळ्या बाजाराने विकणारे दोघे अटकेत

व्यापारी जागा भाड्याने देण्यावर भर

व्यापारी जागा विकत घेण्यापेक्षा भाड्याने देण्यावर व घेण्यावर भर आहे. कारण नवीन आयटी व मॅन्युफॅक्चरिंग उद्योग येत आहेत. भाडेदर भरघोस वाढतील अशी विकसकांना आशा आहे.  मात्र, छोट्या कंपन्या मालकी तत्त्वावर जागा घेणे पसंत करतात. या जागांमध्ये वापरण्याच्या दृष्टीने अनेक बदल करून घ्यावे लागतात. व्यापारी जागांचा आयटी व बीपीएम व्यवसायांना पूरक म्हणून उपयोग होतो. येथे प्रचलित असलेले भाड्याचे ‘सब डॉलर’ दर म्हणजे जगातील सर्वच कंपन्यांना आपले ऑफिस येथे सुरू करण्याच्या दृष्टीने आकर्षक वाटतात.  

मध्यवर्ती ठिकाणामुळे डिमांड

महापालिका मुख्यालय मध्यवर्ती ठिकाणी असल्याने या परिसरात सल्लागार, वकील व इतर व्यावसायिकांना लागणारी छोटी ऑफिसेस विकसित करण्याची संधी निर्माण झाली आहे. अशा ऑफिससाठीची मागणी मुख्यतः व्यवसायाच्या स्वरूपानुसार असेल. त्यामुळे एकंदर बाजारपेठेचा समतोल राखला जाईल. सध्या आधुनिक रिटेल व्यवसायांसाठी उपयुक्त अशी ११ लाख चौरस फूट जागा विकसित आहे. याशिवाय हिंजवडी, वाकड परिसरातही रिटेल व्यवसायासाठी जागा विकसित होत आहेत. मात्र, उद्योग किंवा त्यांच्या सहायक संस्थांना आकर्षक वाटतील अशा ‘अ’ श्रेणीच्या जागा उपलब्ध नाहीत. त्यामुळे कमर्शिअल ऑफिस प्रकल्पांना मागणी येऊ शकेल. शहरात भाड्याचे दर परवडणारे असल्याने व्यापारी वापराच्या जागांसाठीचे प्रकल्प उभारायला गती मिळू शकेल, अशी आशा आहे.

हेही वाचा: पोलिस कर्मचारी महिलेला शिविगाळ करून मारहाण

भविष्यात अधिक संधी

पिंपरी-चिंचवड हा वेगाने प्रगती करणारा विभाग आहे आणि प्रगत पायाभूत सुविधा, स्थानाचा फायदा आणि रास्त दरात जमीन उपलब्ध असणे यामुळे येत्या काही वर्षात इथे नवी गुंतवणूक होण्याला प्रचंड वाव आहे. पिंपरी-चिंचवड भागात उपलब्ध असलेल्या या संधींमुळे येत्या काळात मध्यम कालावधीसाठी तसेच दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना या भागात स्वारस्य निर्माण होणार आहे.  

सर्वेक्षणातील निरीक्षणे

  • स्थानिक बाजारपेठेत सुमारे ११ लाख चौरस फूट नवीन रिटेल व्यवसायासाठी जागा उपलब्ध

  • पुण्यानंतर मध्यम व दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पिंपरी-चिंचवड भागाला प्राधान्य

  • गेल्या पाच वर्षात सर्वसाधारण व्यवसायवृद्धी ही पुण्यातील अनेक स्थानिक बाजारपेठांच्या तुलनेत शहरात अधिक

  • भाड्याचे दर परवडणारे असल्यामुळे व्यापारी वापराच्या जागांसाठीच्या प्रकल्पांना गती

दृष्टिक्षेपात...

  • सर्वात मोठी व्यापारी इमारत आयसीसी देवी गौरव टेक पार्क

  • क्षेत्रफळ सुमारे आठ लाख ६० हजार चौरस फूट अर्थात ७९ हजार ८९७ चौरस मीटर

  • बहुतांश इमारती एक लाख ५० हजार चौरस फूट अर्थात १३ हजार ९३५ चौरस मीटर

शहरे ही प्रगतीचे इंजिन असतात. त्यांच्या सततच्या अंतर्गत परिवर्तनातून गुंतवणूकदार आणि वापरकर्ते मालक अशा दोघांनाही संधी उपलब्ध होत असतात. ‘कॉलिअर्स’च्या या अहवालात पुण्यातील गृहनिर्माण व्यवसाय, त्याचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याबद्दलचे विस्तृत विश्लेषण करण्यात आले आहे‌.

- शुभंकर मित्र, व्यवस्थापकीय संचालक, भारतातील सल्ला व्यवसाय, कॉलिअर्स