
पोलिस कर्मचारी महिलेला शिविगाळ करून मारहाण
पिंपरी - विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका रिक्षाचालकावर कारवाई करीत असताना वाहतूक विभागाच्या कार्यालयात येऊन एकाने गोंधळ घातला. पोलिस कर्मचारी महिलेला शिवीगाळ करीत गचांडी पकडून त्यांना मारहाण देखील केली. हा प्रकार पिंपरी वाहतूक विभाग कार्यालय येथे घडला. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.
प्रल्हाद रामभाऊ कांबळे (वय ५१, रा. कामगार भवन समोर, पिंपरी), रिक्षाचालक अहनद मौल शेख (वय ३३) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. संबंधित पोलिस कर्मचारी महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पोलिस महिला सोमवारी (ता. २६) सकाळी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतूक नियमनाचे काम करीत होत्या. त्यावेळी आरोपी अहनद शेख नेहरूनगर येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे रिक्षा घेऊन विरुद्ध दिशेने आला. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याला थांबवून त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली.
हेही वाचा: गरजू रुग्णालयांना मिनी व्हेंटिलेटर; पेट्रोल-डिझेल असोसिएशनचा पुढाकार
मात्र, रिक्षाचालकाने कागदपत्रे सादर न केल्याने पिंपरी वाहतूक विभागाच्या कार्यालयात आणले. तेथे त्याच्यावर खटला दाखल करण्याचे कायदेशीर काम सुरू असताना आरोपी प्रल्हाद कांबळे तिथे आला. ‘आत्तापर्यंत तुम्ही किती वाहनांवर कारवाई केली याची माहिती मला तत्काळ द्या. तुम्ही हे कशासाठी करता मला चांगले माहिती आहे. पोलिस लाचार आहेत. आम्हाला इथे कशासाठी आणले ते मला माहिती आहे.’ असे म्हणत प्रल्हाद याने आरोपी रिक्षाचालकाला ‘तू जा रे इथून ही काय करते मी पाहतो.’ असे म्हणून पळवून लावले. दरम्यान, फिर्यादी या आरोपी रिक्षाचालकाला पकडण्यासाठी धावले असता प्रल्हादने फिर्यादीची गचांडी पकडून त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्याशी गैरवर्तन करीत त्यांचा विनयभंग केला. वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर सार्वजनिक ठिकाणी थांबून प्रल्हादने पोलिस महिलेला शिवीगाळ केली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे.
Web Title: Police Officer Abuses And Beats Woman
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..