सामाजिक सुरक्षा पथकामुळे पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक पोलिसांना आली जाग!

मंगेश पांडे
Monday, 14 December 2020

  • कारवाईसाठी सामाजिक सुरक्षा पथकाच्या स्थापनेचा परिणाम

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले, तरीही अवैध धंदे सुरूच राहिले. त्यामुळे या कारवाईसाठी आयुक्तांनी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना केली. या पथकाने कारवाईचा धडाका सुरू केल्यानंतर आता स्थानिक पोलिसांकडूनही कारवाई वाढल्याचे दिसून येत आहे. उशिरा का होईना स्थानिक पोलिसांना जाग आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंदे समूळ नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली. आपापल्या ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश संबंधित निरीक्षकांना दिले. सुरुवातीला स्थानिक पोलिसांना संधी दिल्यानंतरही धंदे बंद न झाल्यास आपण कारवाई करू. मात्र, त्यानंतर स्थानिक पोलिसांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही आयुक्तांनी दिला. त्यानुसार अशा धंद्यांवर कारवाई करण्यासाठी आयुक्तांनी २६ सप्टेंबरला सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना केली. स्थानिक पोलिसांकडून कारवाई होणे अपेक्षित असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असलेल्या ठिकाणासह इतर ठिकाणीही पथकाने कारवाई केली. या पथकाने आयुक्तालयांतर्गत असलेल्या विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत आतापर्यंत ४४ कारवाया केल्या आहेत. दरम्यान, ज्या अवैध धंद्यांबाबत पथकाला मिळते त्या धंद्यांची माहिती स्थानिक पोलिसांना का मिळत नाही, असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.  

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सामाजिक सुरक्षा पथकाच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता, आता स्थानिक पोलिसही काहीसे अॅक्टिव्ह झाले आहेत. मागील काही दिवसात स्थानिक पोलिसांनी कारवाई करण्यावर जोर दिला आहे. १ ते १२ डिसेंबर या कालावधीत विविध पोलिस ठाण्यांनी त्यांच्या हद्दीत ४९ कारवाया केल्या आहेत. अवैध धंद्यांविरोधात जोरदार मोहीम सुरू ठेवून अवैध धंदे समूळ नष्ट करावेत, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: local police of pimpri chinchwad have been active for action