लॉकडाउन असूनही पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगार फिरताहेत मोकाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Criminal

लॉकडाउन असूनही पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगार फिरताहेत मोकाट

पिंपरी - कोरोनाचा संसर्ग (Corona Infection) रोखण्यासाठी लॉकडाउन (Lockdown) लागू आहे. मात्र तरीही अनेक नागरिक घराबाहेर पडत आहेत. यामध्ये गुन्हेगारांचाही (Criminal) मुक्तसंचार सुरू असल्याचे सध्या दाखल होत असलेल्या गुन्ह्यांवरून (Crime) स्पष्ट होत आहे. (lockdown criminals are roaming the city of Pimpri Chinchwad)

लॉकडाउनची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या तेरा एंट्री पॉइंटवर व शहरात महत्त्वाच्या ३६ ठिकाणी नाकाबंदी केल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. पोलिस रस्त्यावर असल्याने विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांसह गुन्हेगारांनाही जरब बसने अपेक्षित होते. मात्र, सामान्य नागरिकांसह गुन्हेगारही शहरात मोकाट फिरत आहेत. हे मागील महिनाभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांवरून दिसून येत आहे. १९ मार्च ते १९ एप्रिल या दरम्यान घरफोडीचे १६, चोरीच्या तब्बल १०३, प्राणघातक हल्ल्याच्या १२, मारामारीच्या ६०, तर खुनाच्या दोन घटना घडल्या. यावरून पोलिसांची नाकाबंदी, गस्त सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये ७१६ नवीन रुग्ण; आठ रुग्णांचा मृत्यू

मागील वर्षीच्या लॉकडाउन दरम्यान, गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले होते. संपूर्ण आयुक्तालयाच्या हद्दीत दिवसाला एखादा गुन्हा दाखल व्हायचा. काही दिवशी तर एकाही गुन्ह्याची नोंद झाली नाही. मात्र, ही स्थिती या लॉकडाउन दरम्यान दिसून येत नाही. पोलिस रस्त्यावर असल्याचे बोलले जात असले तरी गुन्ह्यांचे प्रमाण नेहमीप्रमाणेच आहे. यामध्ये गंभीर गुन्ह्यांचाही समावेश आहे. खुनाचा प्रयत्न, दोन गटात हाणामारी यासह घरफोडीचे प्रमाणही अधिक आहे. वाहन चोरट्यांचाही सुळसुळाट आहे. भरदिवसाही चोरीच्या घटना घडल्या आहेत.

दरम्यान, वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील आठवड्यात केलेल्या नाकाबंदीत रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मोठा काळाबाजार उघड झाला. अशाप्रकारे इतरही ठिकाणीही कडक नाकाबंदी केल्यास गुन्हेगारीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नाकाबंदीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी होण्यासह नागरिकांकडेही चौकशी करणे गरजेचे आहे. मात्र, तसे होत नसून अनेक ठिकाणची नाकाबंदी ढिली पडल्याचे दिसून येते. काही ठिकाणी तर पोलिस असूनही चौकशी करीत नाहीत. यामुळेच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांसह गुन्हेगारांचाही वावर वाढला आहे. दरम्यान, लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी व पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यासह गस्त सुरू असल्याचे बोलले जात असले तरी महिनाभरात दाखल असलेल्या गुन्ह्यांवरून हा दावा फोल ठरत असल्याचे दिसून येते.

हेही वाचा: बांधकाम कामगार सेनेच्या संस्थापक अध्यक्षांचे निधन

१९ मार्च ते १९ एप्रिल दरम्यानचे गुन्हे

  • १६ - घरफोडी

  • १०३ - चोरी

  • १२ - प्राणघातक हल्ला

  • ६० - दुखापत, मारामारी

  • २ - खून

loading image
go to top