esakal | आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी?
sakal

बोलून बातमी शोधा

 महाविकास आघाडी

आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ‘महापालिकेच्या आगामी निवडणुकीत केवळ ५० नगरसेवक निवडून आणा, महापौर शिवसेनेचाच होणार!’, असे शब्द शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी आकुर्डीत कार्यकर्त्यांच्या बैठकीत वापरले. ‘५५ आमदारांचा मुख्यमंत्री होऊ शकतो, मग ५० नगरसेवकांचा महापौर का नाही होऊ शकणार!’ अशा प्रश्‍नांकित वक्तव्याची जोडही दिली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडी स्थापन करताना मांडलेल्या गणिताची पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवडमध्ये होणार का? अशी चर्चा शहरात रंगली आहे.

विद्यमान महापालिकेची मुदत मार्च २०२२ मध्ये संपत आहे. त्यामुळे कोरोनाचे सावट हटल्यास आगामी निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यात महापालिकेच्या आगामी निवडणुकीची समीकरणे मांडली गेली. कारण, २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेला १२८ पैकी अवघ्या नऊ जागांवर विजय मिळवता आला होता. भाजपने १२८ पैकी ७७ जागांवर विजय मिळवून महापालिका ताब्यात घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसची १५ वर्षे एक हाती असलेली सत्ता गेली. ३६ जागांवर विजय मिळवून ते विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहेत. आता मात्र, आगामी महापौरांचे उद्दिष्ट शिवसेनेने ठेवले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेसोबत राष्ट्रवादी व काँग्रेसही आहे. मात्र, महापालिकेत काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही. अशा स्थितीत शिवसेनेने आगामी महापौर आमचा होणार, अशी भूमिका मांडली आहे. पण, तो होणार कसा? यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

हेही वाचा: चिखलीत थरार! भरदिवसा तरुणाचा निर्घृण खून

पक्षांचे २०१७ मधील स्थान

महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला. त्यांचे ३९ उमेदवार द्वितीय व ११ उमेदवार तृतीय स्थानावर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ५७, शिवसेनेचे २४ व काँग्रेसचे ४५ उमेदवार द्वितीय स्थानावर होते. तृतीय क्रमांकावर राष्ट्रवादीचे २५, शिवसेनेचे ६१ व काँग्रेसचे पाच उमेदवार होते. या तिघांनी मिळून एकत्रित निवडणूक लढविल्यास जागा वाटपासाठी २०१७ च्या निवडणुकीत मिळालेली मते व द्वितीय स्थानावरील उमेदवारांचे गणित मांडले जाईल. याचा विचार केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस विजयी व द्वितीय स्थानाचा विचार करून ९३ जागांवर दावा करू शकते. शिवसेनेने ५० नगरसेवकांचे टार्गेट ठेवले आहे. द्वितीय स्थानाचा विचार करून काँग्रेस ४५ ठिकाणी हक्क सांगू शकते. म्हणजेच सद्यःस्थितीत १२८ जागा आणि तीनही घटक पक्षांचा १८८ ठिकाणी दावा. त्यामुळे हे गणित सुटणार कसे? हे एक कोडेच आहे. मात्र, सर्व जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवून नंतर सत्ता स्थापनेची मोट बांधणे, असा कार्यक्रम होऊ शकतो. विरोधकांच्या या गणिताकडे सत्ताधारी भाजप कशाप्रकारे पाहतो, यावरही बरेच आराखडे अवलंबून आहेत. कारण, त्यांच्यातील काही शिलेदार पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे.

२०१७ मध्ये पक्षनिहाय मते

पक्ष / मते

भाजप / ११,५३,८५४

राष्ट्रवादी / ८,८९,३४५

शिवसेना / ५,१६,८६०

काँग्रेस / ९७,०७१

मनसे / ४३,०४६

बसप / २०,९९५

एमआयएम / १८,८५८

(अन्य पक्षांना दहा हजारांपेक्षा कमी मते)

loading image