कुवेत येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील कामगाराची आमदार उमा खापरे यांच्या प्रयत्नातून सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uma khapare

कुवेत (दुबई) येथे जादा पगाराच्या अमिषाने कामासाठी सागर सुभाष संकपाळ गेला होता.

कुवेत येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील कामगाराची आमदार उमा खापरे यांच्या प्रयत्नातून सुटका

पिंपरी - कुवेत (दुबई) येथे जादा पगाराच्या अमिषाने कामासाठी सागर सुभाष संकपाळ (वय २८, रा. विजयनगर, कराड, जि. सातारा) गेला होता. सुमारे दीड महिना काम करुनही त्याला व्यवस्थित वेतन मिळाले नाही. त्याची तेथे दयनीय अवस्था झाली. त्यामुळे त्याने कंपनीतील अधिकाऱ्यांना मायदेशी जाण्यासाठी सोडण्याची मागणी केली. त्यामुळे त्याचा पासपोर्ट व मोबाईल जप्त करण्यात आला. भाजपाच्या आमदार उमा खापरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहाय्याने केंद्रीय विदेश मंत्रालयाशी तत्काळ पत्रव्यवहार केल्यामुळे सागरची १० दिवसात सुखरुप सुटका झाली व तो मायदेशी परतला.

सागर व त्याची सुटका करण्यासाठी धावपळ करणारे त्याचे बंधू रोहित यांच्यासह आमदार खापरे यांनी झालेल्या प्रकाराची पत्रकार परिषदेत शुक्रवारी (ता. ११) सायंकाळी माहिती दिली. सागर संकपाळचे आयटीआयचे शिक्षण झाले असून तो सीएनसी बेन्डींग ऑपरेटरचे काम करतो. त्याने यापुर्वी चाकण पसिरातील नामांकीत कंपन्यात काम केलेले आहे. सुमारे ४२ हजार पगाराचे अमिष झाल्याने त्याने नोकरी डॉट कॉमवर अर्ज करुन नाशिक येथील एका एजन्सीच्या माध्यमातून कुवेत येथे नोकरीसाठी १५ सप्टेंबर २०२२ रोजी गेला. सागरने १६ सप्टेंबरपासून ‘दकील अलजेसर’ कंपनीत काम सुरु केले.

घडलेल्या घटनेबाबत सांगताना सागर म्हणाला की, राहत असलेल्या खोलीवर तो सहकाऱ्याबरोबर स्वयंपाक करुन जेवायचा. परंतु; त्याला खाण्याच्या पदार्थातून काही तरी दिले जात असल्याची शंका आहे. मला अस्वस्थ वाटू लागल्यावर त्याने कंपनीत अधिकाऱ्यांकडे मायदेशी परत सोडण्याची मागणी केल्यावर माझा पासपोर्ट व मोबाईल जप्त करण्यात आला. मी दीड महिने काम केलेले असताना मला १५ दिवसांचाच पगार दिला. माझ्यावर शारीरीक अत्याचार करुन खोालीतून हाकलून दिले. त्यामुळे माझी मानसिकस्थिती बिघडली. माझे बंधू रोहित यांच्या मी संपर्कात होतो.

सागरचा मोबाईल लागत नसल्याने १९ सप्टेंबरला सागरचे बंधू रोहित यांनी प्रथम एजन्सीशी संपर्क साधला असता त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. रोहित यांनी सागरच्या अन्य सहकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांना सागरला बाहेर काढल्याची माहिती मिळाली. रोहितने भाजपाच्या आमदार उमा खापरे यांचा मुलगा जयदीप याच्याशी संपर्क साधला. जयदीपने रोहितला आमदार खापरेंकडे बोलविले. त्यानंतर खापरे यांनी विलंब न लावता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करुन विदेश मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला. खापरे यांनी वारंवार पत्रव्यवहाराचा पाठपुरावा केला. केंद्रीय विदेश मंत्रालयाने खापरे यांच्या पाठपुराव्याची दखल घेत सागरला मायदेशी परत आणण्याची व्यवस्था केली. त्यामुळे शुक्रवारी (ता. ११) सागर सुखरूप घरी पोहचला.

कुवेतला दररोज बाहेरील १२ कामगार तरी कारागृहात

सागरचा पासपोर्ट व मोबाईल काढून घेतल्यावर तो सैरभैर झाला. त्याची मानसिक अवस्था व्यवस्थित नसल्याने त्याला रस्त्यावरुन पोलीसांनी पकडले व कारागृहात टाकले. सागर चार दिवस कुवेतच्या कारागृहात होता. त्या ठिकाणी भारत, पाकिस्तान व बांगलादेश आदि देशातून आलेले व काम करुन घेतल्यानंतर विजा संपल्यामुळे व पासपोर्ट काढून घेतल्यामुळे अडकेलेले १२ कामगार रोज कारागृहात येत होते. मला वेळीच आमदार खापरे यांच्या माधयमातून भारताच्या विदेश मंत्रालयाची मदत मिळाल्याने मी लवकर बाहेर पडलो, असे सागरने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

माझ्याकडे सागरचे प्रकरण आल्यावर मी प्रथम उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलले. त्यांनी तत्काळ त्यांच्या दिल्लीतील स्वीय सहाय्यक मनोज मुंडे यांना संपर्क साधून आम्हाला विदेश मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यास सांगितला. आम्ही तत्काळ दि. १ नोव्हेंबरला पत्रव्यवहार केला. पाठपुरावा केल्याने त्याची सुखरुप सुटका झाली. पालकांनीही मुले बाहेर पाठविताना काळजी घ्यायला हवी. नाशिकच्या त्या एजन्सीची चौकशी करण्याची मागणी आम्ही फडणवीस यांच्याकडे करणार आहोत.

- उमा खापरे, आमदार, विधानपरिषद.