
"क" क्षेत्रीय कार्यालय मौजे चिखली प्रभाग क्रमांक 2 जाधव वाडी व कुदळवाडी भागात ही कारवाई पार पडली. या भागातील 18 मीटर देवराई डीपी रोड लगत असलेल्या गट क्रमांक 256, 257, 258, 259 आदी सुमारे 97 हजार 571 चौरस फूट क्षेत्रफळाहून अधिकच्या मोकळ्या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण करण्यात आले आहे.
मोशी : पिंपरी-चिंचवड महापालिका "क" क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने अनधिकृत पत्रा शेडवर बुधवारी (ता. 3) अत्यंत मोठी कारवाई करण्यात आली. अंदाजे 97 हजार 571 चौरस फूटाहून अधिक अशा क्षेत्रफळावर असलेल्या सुमारे 68 हून अधिक पत्राशेडवर ही कारवाई करण्यात आली. चिखली प्रभाग क्रमांक 2 मधील जाधव वाडी, कुदळवाडी आदी परिसरामध्ये ही कारवाई केल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी दिली.
"क" क्षेत्रीय कार्यालय मौजे चिखली प्रभाग क्रमांक 2 जाधव वाडी व कुदळवाडी भागात ही कारवाई पार पडली. या भागातील 18 मीटर देवराई डीपी रोड लगत असलेल्या गट क्रमांक 256, 257, 258, 259 आदी सुमारे 97 हजार 571 चौरस फूट क्षेत्रफळाहून अधिकच्या मोकळ्या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण करण्यात आले आहे. भंगार व्यवसायिक लाकूड, नवीन जुन्या लोखंडाच्या वस्तू, प्लास्टिक अशा विविध वस्तूंच्या विक्री व संकलनासाठी या ठिकाणी 68 हून अधिक अशा मोठ्या प्रमाणावर पत्रा शेड उभारण्यात आल्या होत्या.
जाधव वाडी ते देहू आळंदी बीआरटीएस रस्ता यादरम्यान 18 मीटर एवढ्या रुंदीचा डीपी रस्ता तयार करण्यात आला आहे. या परिसरामध्ये काही भागांमध्ये निवासी घरे तसेच शेकडो सदनिका असलेल्या इमारती आहेत. येथे अनधिकृत पत्राशेडमध्ये होत असलेल्या व्यावसायिक आणि त्यांनी पदपथावर विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तूंमुळे नागरिकांची गैरसोय होत असे. या निवासी भागांकडे ये-जा करणाऱ्या पादचारी नागरिकांना तसेच वाहनचालकांना याचा नेहमीच त्रास सहन करावा लागत होता. अनेक वेळा येथील भंगार गोडाऊन मध्ये आग लागण्याचेही प्रकार घडले होते.
व्यावसायिक त्यांचा माल डीपी रस्त्यालगत असलेल्या पदपथावर ही ठेवण्यात येत होता. नागरिकांना पायी चालण्यासाठी हे पदपथ उपलब्ध नव्हता. त्यामुळे अपघाताची टांगती तलवार नेहमीच डोक्यावर ठेवून या वाहतूकीचा धोका पत्करून भर वाहतुकीच्या रस्त्याने ये-जा करावी लागत होती. दैनिक सकाळमध्ये या अगोदरही अनेक वेळा चिखली, जाधव वाडी, कुदळवाडी, मोशी, मोशी-चिखली प्राधिकरण, तळवडे, डुडुळगाव, चऱ्होली आदी महापालिका क्षेत्र विभागातील पदपथांवर तसेच महापालिकेच्या मोकळ्या भूखंडांवर अतिक्रमणावर कारवाई करावी या संदर्भाच्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या पुढील काळातही महापालिकेच्या या अशा मोकळ्या भूखंडांवर तसेच पदपथांवर यापुढे अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी तसेच नागरिकांना उत्तम अशा सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले
. या कारवाईमध्ये महापालिका बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागाचे अतिरिक्त आयुक्त 2 चे अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सह शहर अभियंता मकरंद निकम यांच्या उपस्थितीत, कार्यकारी अभियंता बांधकाम परवानगी राजेंद्र राणे यांच्या नियंत्रणाखाली, उपअभियंता सुर्यकांत मोहिते, कनिष्ठ अभियंता किरण सगर यांच्यासोबत अतिक्रमण पथक पोलीस कर्मचारी 1 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 17 पुरुष पोलीस, 10 महिला पोलीस, 15 मजूर, 8 जेसीबी, अनेक डंपर, पोलीस व महापालिका वाहने आदी फौजफाट्यासह ही कारवाई करण्यात आली.
''महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई सुरु आहे. ''गुरुवारी 4 फेब्रुवारी रोजीही ही कारवाई सुरू राहणार असून या पुढील काळातही जिथे जिथे अशा प्रकारचे अतिक्रमण करण्यात आले आहे. त्या त्या ठिकाणी ही कारवाई सुरुच राहणार आहे.
- अजित पवार, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.