esakal | #PuneRains : मुसळधार पावसानं शेत नेलं वाहून, चऱ्होलीत भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान 
sakal

बोलून बातमी शोधा

#PuneRains : मुसळधार पावसानं शेत नेलं वाहून, चऱ्होलीत भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान 

विजांच्या कडकडाटासह परतीचा पाऊस जोरदार झाला. पिकांचे नुकसान झाले.

#PuneRains : मुसळधार पावसानं शेत नेलं वाहून, चऱ्होलीत भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान 

sakal_logo
By
पीतांबर लोहार

पिंपरी : विजांच्या कडकडाटासह परतीचा पाऊस जोरदार झाला. पिकांचे नुकसान झाले. इतकेच काय, चऱ्होलीच्या बुर्डेवस्ती, पठारे मळा, निरगुडी रस्ता परिसरातील शेतीचा काही भाग वाहून गेला. त्यामुळे हरभरा, पालक, मेथी, कोथिंबिर, वाल, कांदा अशा पिकांचे नुकसान झाले. लहान असलेली पिके मातीखाली गाडली गेली. अशीच स्थिती दाभाडेवस्ती, वडमुखवाडी, ताजनेमळा, काळजेवाडी, कोतवाल वस्ती, डुडुळगाव परिसरातही बघायला मिळाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बुधवारी (ता. 14) रात्री झालेल्या जोरदार पावसाच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी सकाळी चऱ्होली, डुडुळगाव परिसरात पाहणी केली. रस्त्यांवर चिखल साचला आहे. चऱ्होली गाव ते निरगुडी रस्त्यावर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे माती पसरून रस्ता निसरडा झाला आहे. वाड्यावस्त्यांवरील रस्त्यांचीही हीच स्थिती आहे. काही ठिकाणी झाडांच्या फांद्याही पडलेल्या होत्या. चऱ्होली वेशीजवळ रस्त्याच्या कॉंक्रिटकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची अधिकच गैरसोय झाली. 

शेतकऱ्यांची व्यथा 

- चऱ्होलीतील शेतकरी हेमंत रासकर यांच्या शेताच्या काही भागातील हरभरा वाहून गेला आहे. एका बाजूला सुमारे दोन फूट खोलीचा चर पडला असून, माती वाहून गेली आहे. खाली फक्त खडक दिसू लागला आहे. 

- सुभाष ताम्हाणे यांच्या शेतात भाजीपाला लावलेला होता. पालक, मेथी, कोथिंबिर होती. तेही वाहून गेले आहेत. पाण्यासोबत माती वाहून आल्याने त्याखाली काही भागातील पिके गाडली गेली आहेत. 

- काळूराम भोसले यांच्या शेताचीही हीच अवस्था झाली आहे. त्यांच्या शेतातील वाल व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

- राहुल ताजने यांच्या शेतात नुकतेच मेथी व पालक उगवायला सुरुवात झाली होती. सर्व पीक मातीखाली झाकले गेले आहे. 

- प्रदीप बुर्डे यांच्या शेतातील झेंडूचे दोन दिवसांपूर्वीच नुकसान झाले होते. बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे उरला
- सुरळा झेंडूही भुईसपाट झाला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

चऱ्होली, डुडुळगाव, वडमुखवाडी, चोविसावाडीतील शेतकरी मुख्यत्वे भाजीपाल्याचे पीक घेतात. गेल्या पाच-सहा वर्षांपासून नागरीकरण वाढू लागल्याने मोठमोठ्या सोसायट्या निर्माण झाल्या. पर्यायाने लोकसंख्या वाढली आणि भाजीपाल्यालाही मागणी वाढली. त्यामुळे भाजीपाला लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. शिवाय, चऱ्होली मंडईसह नजिकच्या आळंदी, मोशी उपबाजार, इंद्रायणीनगर, पिंपरी मंडई, भोसरी मंडईत येथील भाजीपाला विक्रीसाठी नेला जातो. मात्र, पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तार पडली... 

वडमुखवाडी ते राजे शिवछत्रपती चौक मोशी प्राधिकरण (वखार महामंडळ चौक) रस्त्यावर उच्चदाब वाहिनीची तार रस्त्यात तुटून पडली आहे. येथील वीजवाहिन्या रस्ता ओलांडून गेलेल्या असल्यामुळे रात्री तुटलेली तार सकाळी दहा वाजेपर्यंत रस्त्यात पडून होती. एका बाजूच्या खांबार अर्धवट स्थितीत लटकत होती. रात्री नऊ वाजेपासून या भागातील वीजपुरवठा खंडित असल्याचे रहिशांनी सांगितले.