Positive Story : थंडीने कुडकुडणाऱ्या जिवाला दिली मायेची ऊब; उत्तर प्रदेशमधील आई-वडिलांची घडवली भेट

मुकुंद परंडवाल
Tuesday, 8 December 2020

  • देहूरोड पोलिसांनी आईवडिलांशी करून दिला संवाद; चुलत्याकडे सुपूर्त 

देहू : वयाच्या दहाव्या वर्षी बेकरीत काम करणाऱ्या मुलाला मारहाण झाली. त्याला कंटाळून बेकरीतून सुटका करून मिळेल त्या दिशेने 'तो' सुटला. पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोडमध्ये पोचला. भल्या सकाळी थंडीत कुडकुडत असलेल्या या लहान मुलाला देहूरोड शहरातील एका व्यक्तीने घरी नेले. दोन दिवस त्याचा सांभाळ केला. त्यानंतर त्याला देहूरोड पोलिस ठाण्यात नेले. तेथे पोलिसांनी त्याच्या उत्तर प्रदेशमधील आईवडिलांची फोनवरून भेट घडवली. तसेच त्याला त्याच्या चुलत्याकडे सुपूर्द केले. इतकचे नाही तर पगाराचे पैसेही बेकरीवाल्याकडून मिळवून दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

देहूरोड शहरातील सामाजिक कार्यकर्ते रेणू रेड्डी यांना महामार्गावर देहूरोड येथे रविवारी (ता. 6) सकाळी मळक्‍या कपड्यात आणि भेदरलेल्या अवस्थेत आस महमंद (वय 10, मूळ रा. जिल्हा बिगनोर, डायपूर, उत्तर प्रदेश) सापडला. त्यांनी त्याला बाजारपेठेतील घरात नेले. त्याला धीर दिला. रेड्डी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आसला आपल्या मुलासारखे सांभाळले. त्याची भीती दूर करून विचारपूस केली. यात आस हा उत्तर प्रदेशातील असल्याचे पुढे आले. तसेच सोमाटणे फाटा येथे बेकरीत काम करीत होता. बेकरीत मारहाण झाल्याने तो तेथून पळाला. पायी रस्त्याने जाताना देहूरोड येथे रेड्डी यांना मिळाला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रेणू रेड्डी यांनी या मुलाला देहूरोड पोलिस ठाण्यात नेले. फौजदार नवनाथ कुदळे यांनी सोमाटणे फाटा येथील बेकरी मालकाला बोलावून घेतले. संपूर्ण विषयाची माहिती घेतली. मुलाची आणि त्याच्या आईचे बोलणेही करून दिले. आई रडतच आपला मुलगा परत मिळावा. त्याला बारामती येथे त्याच्या चुलत्याकडे द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानुसार देहूरोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांनी सोमवारी (ता. 7) रात्री या मुलाच्या चुलत्याला बारामती येथून बोलावून घेतले. सर्व शहानिशा करून त्याचा चुलता अल्ताफ बाबा सिद्धीकी यांच्या ताब्यात दिले. चुलत्याकडे जाताना या मुलाने रेणू रेड्डी यांना मायेने बिलगला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फौजदार नवनाथ कुदळे म्हणाले, "आस हा मूळचा उत्तरप्रदेश येथील आहे. सोमाटणे येथे तो नातेवाइकांकडे होता. तेथून तो घर सोडून गेला. देहूरोड शहरात रेणू रेड्डी यांना सापडला. आसला त्याच्या आईच्या सांगण्यावरून त्याचे चुलते अल्ताफ सिद्धीकी (रा. बारामती) यांच्या ताब्यात दिले आहे. मुलगा सुखरूप आहे.'' 

"संबंधित मुलगा लहान आहे. भीतीने आणि भुकेने व्याकूळ झालेला होता. थंडीत रस्त्याच्याकडे जात असताना त्याची विचारपूस केली. त्याच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिले. यात आनंद मिळाला.'' 
- रेणू रेड्डी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a man from dehuroad introduced a boy from uttar pradesh to his parents