पिंपरी-चिंचवडमधील हॉटेलांमधून साधेपाणी गायब!

सुवर्णा नवले
Wednesday, 28 October 2020

  • बहुंताश ठिकाणी मिनरल वॉटरच्या पॅकबंद बॉटल घेणे बंधनकारक 

पिंपरी : कोणत्याही साध्या किंवा मोठ्या हॉटेलमध्ये गेल्यावर टेबलवर पाण्याचा जार आणि ग्लास दिसायचा. तसेच आपल्या पाठोपाठ येत 'पाणी साधे देवू की मिनरल?' असे प्रसन्न मुद्रेने वेटर विचारायचा. मात्र, लॉकडाउनच्या मोठ्या कालावधीनंतर सुरू झालेल्या हॉटेल इंडस्ट्रीजमधून बहुसंख्य चालकांनी 'साधे पाणी' शब्दच हद्दपार केला आहे. कारण आता जवळपास सर्वच ठिकाणी 'मिनरल वॉटरच्या पॅकबंद बॉटल' विकत घेणे बंधनकारक झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

"पिंपरी गावातील रेस्टॉरंटमध्ये मी पन्नास रुपयांची मिसळ खाल्ली. आणि पाण्यासाठी मला वीस रुपयांची बाटली विकत घ्यावी लागली.'' "मोरवाडीतील हॉटेलमध्ये गेलो, मांसाहारी जेवण केले. टेबलवर नेहमीप्रमाणे ग्लासमध्ये पाणी वेटरकडून मिळालेच नाही. थेट बाटलीबंद पाणीच समोर आणून मांडले. त्यानंतर बिलात बाटलीची दुप्पट किंमत लावली'', अशा तक्रारी लोक करत आहेत. परिणामी, हॉटेल चालकांकडून ही लूट असून, ग्राहकांच्या माथी बाटलीबंद पाणी लादले जाते, अशी नाराजी व्यक्त होत आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनमध्ये हॉटेल व रेस्टॉरंट तब्बल चार ते पाच महिने बंद होते. यापूर्वी केवळ पार्सलला सरकारने परवानगी दिली होती. अद्यापही गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगसाठी केवळ 50 टक्के खवैय्यांनाच हॉटेलमध्ये परवानगी आहे. त्यामुळे जेमतेम नागरिकांची पावले हॉटेलच्या जेवणाकडे वळू लागली आहेत. काही हॉटेलांमध्ये पार्सल सेवा सुरू आहे. मात्र, हॉटेलमालकांनी ही पाण्याची शक्कल लढविल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. दहा रुपयांची बाटली वीस रुपयांना विकली जात आहे. त्यातही काही ठिकाणी या दरात तफावत असल्याचे दिसून येत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हॉटेल व्यावसायिकांची मोनोपॉली 
सरकारी धोरणाप्रमाणे डिस्पोजल प्लेट, डिस्पोजल ग्लास हॉटेलमध्ये वापरण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र, काटेकोरपणे नियमांचे पालन हॉटेल व्यावसायिक करताना दिसत नाहीत. खिशाला हे बजेट परवडणारे नसल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. होलसेलमध्ये चांगल्या दर्जाची पाणी बाटली सहा रुपयांना आहे. ती दहा रुपयांना आणि तेरा रुपयांची बाटली वीस रुपयांना विकली जात आहे. काही ठिकाणी गिऱ्हाईक पाहून हा दर 30 ते 35 रुपये आकारला जातो. 

काय करावे हॉटेल व्यावसायिकांनी 
हॉटेलचालकांनी बाटलीबंद पाणी देताना गिऱ्हाइकाला विचारणा करणे आवश्‍यक आहे. तत्पूर्वी साधे पाणी नियमितपणे देणे गरजेचे आहे. ते देखील मिनरल वॉटर. त्यामुळे बाटलीबंद पाण्याची सक्ती करणे चुकीचे आहे. गिऱ्हाईकाच्या खिशाला एक प्रकारे कात्री लावली जात आहे. काही जणांना नाइलाजास्तव हॉटेलचा आधार घ्यावा लागतो, मात्र, हा भुर्दंड बसतो आहे. 

काय प्रकार आहे 
सध्या हॉटेलमध्ये वेटर नाहीत. कामगार वर्ग जेमतेम आहे. त्यामुळे हात धुण्यासाठी पाणी व टेबलवर सेवा देण्यासाठी वेटर नाहीत. त्यामुळे सध्या बाटलीबंद पाणी पुरवावे लागते, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mandatory to buy packaged bottles of mineral water in Pimpri Chinchwad's hotels