Video : बाप्पाला घडविणाऱ्या हातांना सतावतेय ही चिंता; पेणमधील मूर्ती उत्पादक म्हणतात...

अवधूत कुलकर्णी 
मंगळवार, 30 जून 2020

  • गणेशमूर्तींची विक्री थंडावली 
  • पेणमधील स्थिती; व्यावसायिक आर्थिक अडचणीत 

पिंपरी : राज्यसरकारने गणेशमूर्तींची उंची चार फुटापर्यंतच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडं मुंबई, पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे व्यापाऱ्यांनी अद्याप मागणी नोंदवलेली नाही. त्यामुळे पेणमधील मूर्तीचे उत्पादक चिंतेत सापडले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पेणमधील सुंदर आणि आकर्षक गणेशमूर्तींना सर्व देशभरातून मागणी असते. साधारणपणे गणेशोत्सव संपल्यानंतर लगेचच तेथील व्यावसायिक मूर्ती बनविण्यास सुरुवात करतात. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तुलनेने लवकर तयार होतात. गणेश मंडळांना लागणाऱ्या मोठ्या मूर्ती या प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनविल्या जातात. पेणजवळील जोहा, अमरापूर या भागातील व्यावसायिक मोठ्या मूर्तींचे उत्पादन करतात. शाडूच्या मूर्तींना घरगुती ग्राहकांकडून जास्त मागणी असते. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई आणि पुणे परिसरातील नागरिक घरातच मूर्तींचे विसर्जन करणार असल्याचे सांगतात. त्यामुळे साहजिकच त्यासाठी लहान मूर्तींना प्राधान्य देणार असल्याचे अनेक ग्राहकांनी कळविले आहे. 

मुंबईतून मागणी घटण्याचा धोका 

मुंबईत अनेक व्यापारी मंडप टाकून गणेशमूर्तींची विक्री करतात. त्यासाठी दोन महिने आधीच मूर्ती खरेदी करुन दुकाने थाटतात. मात्र, दोन महिन्यांवर गणेशोत्सव आला आहे. अद्याप या व्यापाऱ्यांनी मूर्तींची खरेदी केलेली नाही. पुण्यात केवळ 15 दिवस ते तीन आठवडे आधी मूर्तींची दुकाने थाटण्यात येतात. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत अशा प्रकारे मंडप टाकून मूर्ती विकण्यास परवानगी मिळेल की नाही, याबाबतही व्यापारी साशंक आहेत. त्याचाही मागणीवर परिणाम झाला आहे. 

विक्रेत्यांमधील वाढत्या स्पर्धेचा परिणाम 

एखाद्या विक्रेत्याने मूर्तीची किंमत एक हजार रुपये सांगितली, तर ती मूर्ती व्यापाऱ्यांकडून 700 रुपयांनाच मागितली जाते. कारागीरांचे वेतन, रंगांचे दरवर्षी वाढणारे दर, वीजबिल इत्यादींचा विचार करता किंमत कमी करणे परवडत नसल्याचे काही उत्पादक सांगतात. त्यामुळे व्यापारी अन्य उत्पादकाकडे वळतात. त्यामुळे काही व्यापाऱ्यांना नाईलाजास्तव व्यापाऱ्यांना कमी किमतीत मूर्ती विकाव्या लागतात. 

कारागिरांची समस्या 

प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती बनविणे तुलनेने सोपे असते. मात्र, शाडूच्या मूर्तीला यंदा जास्त मागणी येण्याची शक्‍यता आहे. त्यामानाने मूर्ती कमी आहेत. दुसरीकडे अशा मूर्ती करण्यासाठी प्रशिक्षित कारागिरांची गरज असते. तसे कारागीर कमी आहेत. त्यामुळे या मूर्तींची मागणी पूर्ण होईल का, याबाबत कारखानदार साशंकता व्यक्त करीत आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरात वाढ अटळ 

लॉकडाउनमुळे रंगांचा पुरवठा मागणीच्या मानाने कमी होता. त्यामुळे रंगांच्या किमतीत प्रतिलिटर मागे 100 ते 200 रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी मूर्तींच्या किमतीही वाढणार आहेत. 

यासंदर्भात पेणमधील मूर्ती उत्पादक राजेश वडके यांनी सांगितले, "आम्ही दरवर्षी साधारणपणे पाच हजार मूर्ती विकतो. आतापर्यंत आमच्या 90 टक्के मूर्तींची विक्री झालेली असते. यंदा केवळ दहा टक्के मूर्तीच विकल्या गेल्या आहेत. शाडूच्या मूर्तींना मागणी आहे. मात्र कोरोनामुळे व्यापारी खरेदी करीत नाहीत.'' अन्य एक मूर्ती उत्पादक मनोहर चोनकर यांनी सांगितले, "यंदा मूर्ती विक्री पूर्ण न झाल्यास कर्जाची परतफेड कशी करायची, कामगारांना पगार कोठून द्यायचा असा प्रश्‍न आहे.'' 

आकडे बोलतात 

  • पेण परिसरातील मूर्तींचे कारखाने - 1000 ते 1500 
  • सर्व प्रकारच्या कामगारांची संख्या - एक लाखांहून अधिक 
  • एकूण आर्थिक उलाढाल - 50 ते 100 कोटी रुपये 
  • सर्वांत लहान मूर्ती - 250 रुपये 
  • मंडळांसाठीची पाच फूट उंचीची मूर्ती - नऊ ते दहा हजार रुपये 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनेक व्यावसायिक बॅंकांकडून कर्ज घेऊन मूर्ती तयार करतात. यंदा मूर्तींची विक्री अद्याप अपेक्षित झालेली नाही. त्यामुळे बॅंकांची कर्जे कशी फेडायची असा प्रश्‍न व्यावसायिकांपुढे आहे. 

- श्रीकांत देवधर, अध्यक्ष - गणेश मूर्तीकार आणि व्यावसायिक कल्याणकारी मंडळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manufacturers of ganesh idols in pen are found in anxiety