पुणे : ...म्हणून आंतरजिल्हा एसटी प्रवासासाठी वाट पहावी लागणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

राज्यातील आंतर जिल्हा एसटी प्रवासासाठी नागरिकांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

पिंपरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वल्लभनगर एसटी स्थानकावरून राज्यातील आंतरजिल्हा एसटी प्रवासासाठी नागरिकांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड विभाग हे रेडझोनमध्ये येत असल्याने एसटी प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आली असल्याचे वल्लभनगर एसटी आगाराने म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील काही आठवड्यांपासून वल्लभनगर एसटी स्थानकावरून पोलिसांच्या मंजुरीनंतर छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांतील परप्रांतीय मजूरांना त्यांच्या मूळगावी पाठविले जात आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना राज्यांतर्गत आंतरजिल्हा एसटी प्रवासी वाहतूक कधी सुरू होणार? याबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे. राज्यात पहिली टाळेबंदी जाहीर झाल्यावर शहरातील अनेक नागरिक सहकुटुंब मूळगावी परतले. त्यांनाही परत शहरात यायचे आहे. तर काही नागरिक इथेच नातेवाईक किंवा भाड्यांच्या खोल्यांमध्ये अडकून पडले आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांचे एसटीची राज्यांतर्गत आंतर जिल्हा प्रवासी वाहतूक कधी सुरू होणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टाळेबंदी 31 मेपर्यंत असल्याने तसेच, शाळा-महाविद्यालये तूर्तास बंद आहेत. मात्र, पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधित रुग्णसंख्याही वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वल्लभनगर एसटी आगार व्यवस्थापक सुनील हिवाळे म्हणाले, "राज्यांतर्गत आंतरजिल्हा एसटी प्रवासी वाहतूक अद्याप बंदच आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही शहरे रेडझोनमध्ये येत असल्याने आमच्या आगारामधून प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी मिळालेली नाही. पुणे जिल्ह्याच्या काही ग्रामीण भागांतील एसटीसेवा सुरू झाली आहे. परंतु, तेथेही प्रवासी संख्या कमी आहे. राज्य सरकारचे आदेश प्राप्त होईपर्यंत आम्हाला नियोजन करता येत नाही. टाळेबंदीच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे कदाचित किमान 31 मेपर्यंत वल्लभनगर आगारामधून आंतर जिल्हा एसटीसेवा सुरू होऊ शकणार नाही.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news about Inter-district ST bus travel pune pimpri chinchwad